Paaru and Savalyachi Janu Savali Mahasangam: ‘पारू’ व ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहायला मिळत आहे.
या महासंगममध्ये दाखविल्याप्रमाणे तिल्लोतमाचा मुलगा सोहम व विश्वंभर ठाकूरची मुलगी कियारा यांचे लग्न ठरले होते. या लग्नाच्या विधींना तिल्लोत्तमाने तिची खास मैत्रीण अहिल्यादेवीलादेखील आमंत्रित केले होते. मात्र, विश्वंभर ठाकूर व त्याचा भाऊ लाचखोर असल्याचे अहिल्यादेवीने तिलोत्तमाला सांगितले. त्यानंतर विश्वंभर ठाकूर व अहिल्यादेवीमध्ये वाद झाला.
अहिल्यादेवी किर्लोस्करने विश्वंभर ठाकूरबरोबर नाते न जोडण्याचा तिलोत्तमाला सल्ला दिला. तिलोत्तमाने सोहम व कियाराचे लग्न मोडले. कियाराने सोहम फक्त तिचाच असल्याचे म्हटले. विश्वंभरने याचा बदला घेण्याची धमकी दिली.
सगळे घरी गेल्यानंतर कियाराने एका इमारतीवर जाऊन आत्महत्या करेन असा मेसेज सोहम, सारंग, पारू यांच्या फोनवर पाठवला. तो मेसेज पाहून पारू, सावली, आदित्य, प्रीतम, सारंग, सोहम त्या ठिकाणी गेले. सोहमने लग्नासाठी होकार द्यावा, नाहीतर ती इमारतीवरून खाली उडी मारून जीव देईल, अशी धमकी कियाराने दिली. सोहमने सारंगच्या सांगण्यावरून तात्पुरता होकार दिला. त्यानंतर कियाराला तिच्या घरी घेऊन गेले. तसेच तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सोहमने होकार दिला होता, असे स्पष्ट केले.
विश्वंभर ठाकूरचा अहिल्यादेवीविरूद्ध मोठा कट
आता झी मराठी वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये विश्वंभर ठाकूरने त्याचा कट रचल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, विश्वंभर ठाकूर त्याच्या मुलीला कियाराला म्हणतो, तुझं लग्न फक्त त्या सोहमबरोबर होईल हे माझं वचन आहे, असा बदला घेईन की आयुष्यभर लक्षात राहील.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आदित्य व सारंग अहिल्यादेवीला शोधत आहेत. आदित्य विश्वंभर ठाकूरला म्हणतो, आई कुठे आहे ते सांग नाहीतर मी तुझा जीव घेईन. त्यावर विश्वंभर ठाकूर म्हणतो, मला वाटतं ती गेलीच असेल. त्यानंतर सारंग व आदित्य गुंडांबरोबर मारामारी करताना दिसत आहेत. दोघे मिळून गुंडांचा सामना करताना दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आदित्य आणि सारंग मिळून विश्वंभरचा डाव उधळून लावणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, विश्वंभर ठाकूर त्याच्या योजनेत यशस्वी होणार की सारंग व आदित्य त्यातून मार्ग काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.