छोट्या पडद्यावरील मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे मालिकांमध्ये नेहमीच प्रेक्षकांना रंजक ट्विस्ट पाहायला मिळतात. काही वेळा नव्या कलाकारांच्या एन्ट्री होतात, तर अनेकदा काही जुने कलाकार अर्ध्यावर मालिका सोडण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे, रिप्लेसमेंट म्हणून संबंधित मालिकांमध्ये नव्या कलाकारांची वर्णी लागते.
काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून मुख्य अभिनेत्री दिशा परदेशीने एक्झिट घेतली होती. दिशाने वैद्यकीय कारणांमुळे मालिका सोडली होती. आता यानंतर याच वाहिनीवरील आणखी एका लोकप्रिय मालिकेतून लागोपाठ दोन कलाकारांनी एक्झिट घेतली आहे.
‘झी मराठी’वर गेल्यावर्षी फेब्रुवारी ( २०२४ ) महिन्यात ‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. सध्या ही मालिका दोन कलाकारांनी लागोपाठ एक्झिट घेतल्यामुळे चर्चेत आली आहे.
नुकताच, ‘शिवा’च्या सासूबाईंची म्हणजेच सिताईंची भूमिका साकारणाऱ्या भूमिका साकारणाऱ्या मीरा वेलणकरांनी भावुक पोस्ट शेअर करत या मालिकेचा निरोप घेतला. आता या पाठोपाठ ‘शिवा’च्या सासऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या समीर पाटील यांनीही ही मालिका सोडली आहे.
आता इथून पुढे सिताईंची भूमिका मालिकेत अभिनेत्री स्नेहा रायकर साकारणार आहेत. तर, रामभाऊंच्या ( रामचंद्र देसाई ) भूमिकेत अभिनेते रमेश वाणी झळकणार आहेत.
मालिकेचा निरोप घेताना अभिनेते समीर पाटील लिहितात, “रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ… सर्व मित्र-मैत्रिणी आणि रसिक प्रेक्षकांना सांगताना आनंद आणि दु:ख एकत्र होतंय कारण, आता यापुढे ‘शिवा’ मालिकेत मी रामभाऊंची भूमिका साकारणार नाहीये. या भूमिकेला तुम्ही खूप प्रेम दिलं…आणि वेळोवेळी तुमचं या भूमिकेवर किती प्रेम आहे हे सुद्धा मला सांगितलंत यासाठी तुम्हा प्रेक्षकांचे खूप-खूप आभार. रामभाऊ या व्यक्तिरेखेला ‘झी मराठी’चा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे… याचं समाधान वेगळ आहेच. या प्रवासात खूप मित्र जोडले गेले त्यांचेही आभार. लवकरच नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने पुन्हा भेटू.”
दरम्यान, मीरा वेलणकर यांनी देखील अशाच प्रकारे भावुक पोस्ट शेअर करत सिताईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.