आपल्या फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे उर्फी जावेद सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच चित्रविचित्र कपड्यातील फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तिचे फोटो फार व्हायरल होतात. तिने तिच्या चित्र विचित्र लूकमुळे सर्व सामान्यांपासून बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे लक्ष वेधून घेतले आहे. अनोखा फॅशन ट्रेंड सेट करणारी उर्फी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिला ब्लॅकमेल करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीबद्दलची माहिती दिली आहे. उर्फी जावेदच्या या पोस्टनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. यानंतर तिने नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती सांगितली आहे.
उर्फी जावेदला येत होते धमक्यांचे फोन
उर्फी जावेदने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिने ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर केले. यात ती म्हणाली, मला सतत त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव ओबेद अफरीदी असे आहे. तो त्याच्या मैत्रिणीसोबत मिळून एका शार्प शूटरला फोन करुन मला धमकावायला सांगायचा. तसेच त्याने माझ्यावर ब्लॅकमेलिंगबद्दलची पोस्ट काढून टाकण्यासाठी दबावही आणला होता. मी माझ्याजवळ असलेले सर्व पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. त्यात मी त्या शूटरसह दोघांच्या नावाचा उल्लेख केला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या उद्देशाने लोकांसमोर जाता, तेव्हा तुम्हाला अशाप्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. पण एखादी स्त्री जर स्वत:साठी खंबीरपणे उभी राहत असेल तर त्याचा अर्थ ती सर्व महिलांच्या वतीने उभी असते.
“…त्यावेळी माझ्याकडे सर्व वाईट नजरेने पाहायचे” पतीच्या मृत्यूबद्दल बोलताना सोनाली फोगट झाल्या होत्या भावूक
मी घाबरत नाही
उर्फी जावेदने तिला धमकी देणाऱ्या व्यक्तीसोबतच्या चॅट्सचे अनेक स्क्रीनशॉट्स स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉट्ससोबत तिने एक व्हिडीओदेखील शेअर केला. त्या शार्प शूटरने मला व्हिडीओ पाठवून धमकी दिली, असा दावा उर्फीने केला आहे. मला मध्यरात्री एका व्यक्तीचा व्हिडीओ कॉल आला. तेव्हा मी कॉल उचलला नाही. त्या व्यक्तीने टिल्लू ताजपुरिया नाव असणाऱ्या गुंडाच्या टोळीतील शार्प शूटरचा अटकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर मी घाबरतच इतक्या रात्री व्हिडीओ पाठवणाऱ्या आणि कॉल करणाऱ्या व्यक्तीला त्याचे नाव विचारले. तर त्याने समोरुन काहीही रिप्लाय दिला नाही.
उर्फीच्या मते, मी ती इन्स्टा स्टोरी काढावी, असे धमकावणाऱ्या व्यक्तीला अप्रत्यक्षरित्या सांगायचे होते. पण मी देखील कोणाला न घाबरता कॉल करुन त्रास देणाऱ्याला भित नाही असे सांगितले. त्यासोबत मी तुम्हा गुन्हेगारांना शिक्षा द्यायला लावेन, असेही ती म्हणाली. उर्फीच्या तक्रारीनंतर अटक केलेल्या त्या व्यक्तीची काही तासातच जामीनावर सुटका करण्यात आली.
यानंतर प्रतिक्रिया देताना तिने माझा सुरक्षा यंत्रणेवरून विश्वास उडाला आहे. ज्या माणसाने मला जीवे मारण्याची धमकी दिली, मेसेज करुन त्रास दिला, तो आता जामीन घेऊन बाहेर फिरतो आहे. माझा आता तपास यंत्रणेवरून विश्वास उडाला आहे. मला असुरक्षित वाटत आहे. महिलांसाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही. भारतामध्ये तुम्ही स्त्रियांची उघडपणे छेडछाड करू शकता, त्यांना ब्लॅकमेल करू शकता. तुम्हाला काहीही होणार नाही. मी एक सेलिब्रेटी आहे, मला अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तर मग सामान्य मुलींना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागत असेल, याचा अंदाजही मी लावू शकत नाही, असा संताप उर्फीने व्यक्त केला आहे.