07 March 2021

News Flash

१०१. सत् आणि असत् संग

मनोबोधाच्या अठराव्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत समर्थानी सांगितलं होतं की, जो परमात्मा आहे

मनोबोधाच्या अठराव्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत समर्थानी सांगितलं होतं की, जो परमात्मा आहे त्याचं अचूक गुणवर्णन करणं वेदांनाही साधलं नाही, तरी जी त्याच्या गुणवर्णनात दंग आहेत (जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें) त्या परमात्म्याच्या गुणगानात जर आयुष्य सरलं तर ते सुंदर होतं (तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणें।।) आणि मग एकोणिसाव्या श्लोकात जे सत्य आहे तेच स्वीकारा आणि सांगा आणि जे मिथ्या आहे ते टाका, असं सांगितलं. तेव्हा खरं तर काय सत्य आहे त्याचं सूचन अठराव्या श्लोकात झालेलंच आहे.. हे सत्य म्हणजेच शाश्वत असं परमतत्त्व. मग त्या शाश्वताव्यतिरिक्त आणि त्या शाश्वतापासून दूर करणारं जे जे आहे ते अशाश्वतच आहे. तरीही जे शाश्वत आहे ते मला मिथ्या म्हणजे काल्पनिक वाटतं आणि जे अशाश्वत आहे तेच सत्य म्हणजे कायमचं वाटतं. या अशाश्वतात इतकी शक्ती आहे की ते शाश्वतापासून मला दूर करू शकतं! याचं कारण माझं मनही त्याच शक्तीला वश आहे!! त्यामुळे या जगण्याचा खरा शाश्वत लाभ कोणता आणि जगण्यातलं अशाश्वत काय, त्याची उकल जन्मभर होत नाही. आपलं सगळं जगणं कसं आहे? समर्थाच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘नेणतां जन्मलों आम्हीं। चुकतां दुख पावलों। फावलों बहुतां लोकां। कावलों मनिच्या मनीं।।’’ आमचा जन्माचं जे वासनाबीज आहे ते नेमकं आम्हाला माहीत नाही. त्यामुळेच याच समाजात, याच माणसांत, याच परिस्थितीत आपण का जन्मलो आणि प्रतिकूलतेशी झगडतानाही जे वाटय़ाला येतं तेच स्वीकारत का जगावं लागतं, हे आपल्याला उमगत नाही. (नेणतां जन्मलों आम्हीं। ) त्यात मनाच्या ओढीनं आम्ही बोलू नये ते बोलतो, वागू नये तसं वागतो, करू नये ते करतो. त्यामुळे दु:खंच वाटय़ाला येत असतं (चुकतां दुख पावलों।) तरीही जगाला आमच्या मनाजोगतं करण्यासाठी आम्ही धडपडतो आणि त्यात अनेकदा जगाला आवडेल असंच वागू लागतो. त्यामुळे जगाचं फावतं तरी आमच्या मनाला मात्र समाधान लाभत नाही. (फावलों बहुतां लोकां। कावलों मनिच्या मनीं।।’) आमचं सगळं जगणं हे मीकेंद्रित आहे आणि हा देह म्हणजेच मी ही आमची ओळख आहे, असा आमचा जन्मजात दृढ समज आहे. त्यामुळे या देहाच्यापलीकडे आमच्या मननाची, चिंतनाची, कल्पनेची, विचाराची मजलच जात नाही. खरं तर याच देहाच्या क्षमतांच्या जोरावर अशाश्वतातून शाश्वताकडे जाण्याची पूर्ण संधी असूनही आम्ही याच क्षमतांच्या जोरावर अशाश्वतातच अधिकच गुरफटत राहातो. समर्थाच्या एका श्लोकबद्ध प्रकरणाचा उल्लेख मागे केला आहेच. त्यात ते म्हणतात, ‘‘देह हें असार कृमींचें कोठार। परी येणें सार पाविजेतें।। १।।’’ हा देह असार असला तरी त्याच्याच आधारावर सार तत्त्व जे आहे त्याची प्राप्ती होऊ शकते. ‘‘देहसंगें प्राणी अधोगती जाती। आणी धन्य होती देहेसंगें।।९।। देहेसंगें बद्ध देहेसंगें मुक्त। देहेसंगें भक्त होत असे।।१०।। देहेसंगें वृत्ती होतसे निवृत्ती। गती अवगती देहेसंगें।।१२।।’’ याच देहाच्या संगतीत विकार-वासनांना भुलून जीव अधोगतीलाही जातो आणि याच देहाला साधनेला लावून संकुचित मनोवृत्तींवर ताबा मिळवत हाच जीव जगणं धन्यही करू शकतो. याच देहापायी जीव बद्धही होतो आणि याच देहाच्या आधारावर जीव मुक्तीही प्राप्त करू शकतो. याच देहाच्या आधारावर तो भक्त होतो, वृत्तींपासून निवृत्त होतो.. गती आणि अधोगती या दोन्ही दिशांनी याच देहाच्या जोरावर जाता येतं.. मग जो या देहभावातच गुंतून जगत राहातो तो देहाच्या आतील, अंतरंगातील शाश्वत सूक्ष्म तत्त्वापर्यंत पोहोचतच नाही. मग ते तत्त्व जाणून त्याच्याशी ऐक्य पावणं तर दूरची गोष्ट! समर्थ मात्र सांगतात, ‘‘अंतरनिष्ठ तितुके तरले। अंतर भ्रष्ट तितुके बुडाले।।’’
– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 2:59 am

Web Title: manoyog
Next Stories
1 १००. सत्य मिथ्या
2 ९९. वियोग भय
3 ९८. अपेक्षित-अनपेक्षित..
Just Now!
X