13 July 2020

News Flash

माणुसकीचं तंत्र, मग मंत्र!

एका सरळ मनाच्या निरक्षर तरुणाला भजन आणि व्यायामाचा चांद लागला होता.

एका सरळ मनाच्या निरक्षर तरुणाला भजन आणि व्यायामाचा चांद लागला होता. त्याच्या मनात समाजासाठीही काहीतरी करावं, ही आस होती. त्यानं तुकडोजी महाराजांना तस कळवलं. महाराजांनी त्याला लिहिलेल्या पत्रात म्हंटलं होतं की, ’’ तुला प्रार्थना, भजन आणि व्यायामाचाही उत्तम नाद लागलेला आहे. अरे हे भाग्य सर्वच लोकांना लाभत नाही. मनुष्य हा कुसंगतीमुळे धड मनुष्य राहिलेला नाही आणि धड जनावरही राहिलेला नाही. त्याची अजब अवस्था झाली आहे. मनुष्य म्हणावा तर त्याला संस्कृती नाही नि धर्मही नाही. समाजसेवा नाही. किंबहुना कुणाशी कसं वागावं, याचं ज्ञानही नाही. म्हणे मी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि प्रमाणपत्रही मिळालं आहे. असेल तर ते सरकारी नोकरीकरता! पण बाबा, चार लोकांत तुला काही स्थान आहे का? समाजाच्या सुख-दुखाची तुला काही जाणीव आहे का? भारताच्या काही साधू-संतांचा तुला काही परिचय आहे का? काही धर्मग्रंथांचं वाचन? तुझ्या घरी तुझ्या संस्कृतीचं काही चिन्ह? राष्ट्रपुरुषांची छायाचित्रं तरी? चार गरीब लोक तुझ्याजवळ येऊन प्रेमानं बोलतात तरी का? तू त्यांना मोकळ्या मनानं आपलं तरी मानतोस काय? असे तर काहीच नाही. आपल्याच थाटात, आपल्याच तालात वय जाते. याला काय माणूस म्हणतात? समाजाने तुझा काय बरे धडा घ्यावा? असे आज-काल झाले आहे. तू मजूर असूनसुद्धा आपल्या पोटाचा धंदा करून सकाळ सायंकाळ ध्यान, सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामसेवेत आपला वेळ देतोस आणि व्यायामाच्या सवयीने तुझ्या शरीराचा बांधा पोशाखाशिवायही उत्तम ठेवलास ही फार मोठी गोष्ट आहे. मित्रा, कधीतरी तुम्हा लोकांची गरज देशाला असेल. आपण सर्व देशाचे संस्कृतीच्या यंत्राचे घटक आहोत. जेव्हा देशात लढाई येईल तेव्हा आपण धडाडीने सैनिक होऊन देशाला विजयी केले पाहिजे. जेव्हा देशात अन्न-धान्याचा तुटवडा पडेल, तेव्हा शेतात राबून साथीसांगातीं घेऊन धन-धान्य वाढविण्याला मदत केली पाहिजे. रोगराई वाढेल तेव्हा घरोघरी जाऊन रोग्याची सेवा केली पाहिजे. अशी अनेक समाजसेवेची कामे करून आपला जीव, देह सार्थकी लावला पाहिजे. हाच खरया  सेवकाचा बाणा आहे. मानवाचे कर्तव्य आहे. काही लोक माझ्याकडे मंत्र मागतात. मी त्यांना म्हणतो, अहो जरा माणुसकीचे तंत्र तर अगोदर शिका. नंतर मंत्रवाल्या गुरुकडे जा. नाहीतर बिचारा गुरुही बदनाम आणि तुम्हीही तसेच ठोंबे राहाल! हे बघा, माझ्याजवळ हाच मंत्र आहे. समाजाच्या कामी पडा आणि आपले नाव लोकांच्या तोंडी उत्तम माणूस म्हणून आणा, हाच माझा मंत्र आहे.

– तुकडोजी महाराज (राष्ट्रसंतांची पत्रे या पुस्तकातून)

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2018 1:58 am

Web Title: samarth ramdas philosophy 371
Next Stories
1 ३४. दीन-दास : २
2 चिंतनधारा : ५. विचाराचं बोट
3 चिंतनधारा : ४. कृती तसं फळ
Just Now!
X