विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com
शाळांच्या वार्षिक परीक्षा संपण्यापूर्वीच आई-बाबांनी पूर्वी गावी जाण्यासाठी एसटीची तिकिटे काढलेली असायची. शेवटचा पेपर संपला की, अनेक  जण निकालाचीही वाट न पाहता आधी गावची वाट पकडायचे. निकाल शाळेत घेऊन तो कळविण्याची जबाबदारी आई- बाबांची असायची. अर्थात त्या वेळेस अनेकांना स्वत:चे गाव होते किंवा मामाचे गाव तरी असायचे. आता जमाना बदलला आहे आणि सुट्टी घालविण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. मध्यंतरी सारा कब्जा केला होता तो टीव्ही आणि त्यावर लागणाऱ्या कार्टून्सनी. त्याच वेळेस व्हिडीओ गेम्सचे प्रस्थही चांगलेच वाढले होते. आता ती जागा मोबाइल गेम्सनी घेतली आहे. शहरात मैदानेही फारशी शिल्लक राहिलेली नाहीत. मग मुलांनी जायचे कुठे, हा प्रश्नच आहे. पूर्वी लहान मुलांची मासिकेही चांगली दर्जेदार होती आणि चांगले सुट्टी विशेषांक बाजारात यायचे, पण अलीकडे मुले फारशी वाचतच नाहीत, अशी पालकांची तक्रार असते. मुलांनी त्याच त्या राजा-राणीच्या गोष्टी का म्हणून वाचायच्या? याच प्रश्नाने अस्वस्थ होऊन पाच वर्षांपूर्वी ‘लोकप्रभा’ने लहान मुलांना आताच्या काळाचे भान देणाऱ्या कथा घेऊन बाल किंवा सुट्टी विशेषांक प्रसिद्ध करण्याची परंपरा सुरू केली. यंदाही असाच काळाचे आधुनिक भान देणारा हा विशेषांक केवळ आमच्या बालच नव्हे तर त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या मोठय़ा पिढीच्याही हाती देताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. या कथा लहान मुलांबरोबरच मोठय़ांच्या पिढीलाही नक्कीच आवडतील.

लाकूडतोडय़ाची गोष्ट तर सर्वानीच वाचलेली असते, पण या अंकातील गोष्टीमध्ये असलेला लाकूडतोडय़ा आणि वनदेवी दोघेही एकविसाव्या शतकातील आहेत, ते या नव्या काळाचे भान देणारे आहेत. दुसऱ्या एका गोष्टीत बिरबलाची कथा तीच असली तरी त्या गोष्टीतील आजी मात्र नवा दृष्टिकोन देणारी आहे. ‘किन्शु आणि झुंकी’ तर प्राणिमित्र आणि यंत्र यांच्यातील फरक नेमका स्पष्ट करणारी आहे. भास्करच्या डायरीतील काही पाने ही केवळ छोटय़ांनाच नव्हे तर मोठय़ांनाही अंतर्मुख करतील. अपंग, गतिमंद (दिव्यांग) हेदेखील याच समाजाचे एक अविभाज्य घटक आहेत, त्यांचा विचार आपण केव्हा करणार? भास्करच्या डायरीतील ही पाने त्यांच्याविषयीच्या संवेदना जागृत करून नवे भान नक्कीच देतील. या सर्व कथा आणि छोटेखानी नाटकही नवे भान देणारेच आहे. आपण इतर कुणासारखे का व्हायचे, असा प्रश्न हे नाटक वाचून नक्कीच पडेल.

आमचा अनुभव असे सांगतो की, चांगले दर्जेदार व काळाचे नवे भान असणारे असे काही दिले तर त्याला प्रतिसाद नक्कीच मिळतो. नव्या पिढीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या काव्यपंक्तीमध्ये थोडा बदल करून म्हणावेसे वाटते, ‘पुस्तकही वाचा आणि खेळा, नाचा!’

सुट्टी मस्त एन्जॉय करा आणि काही वेगळे केलेत तर आम्हाला नक्की कळवा!

मस्त वाचा, खेळा, नाचा!