आदित्य यांच्यासह सेना आमदारांचे राज्यपालांना साकडे

मुंबई : कोकणासह राज्याच्या विविध भागांत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे हे पावसाचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करणार असून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आदेश शिवसैनिकांना देण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवनवर जाऊन भेट घेतली. कोकणात कयार वादळामुळे मच्छीमार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ३२८ जनावरे मृत्युमुखी पडली. तर राज्यात विविध भागांत अवकाळी पावसामुळे भात, कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्षे आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक, मच्छीमार अशा सर्वानाच मदतीची गरज असून त्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेतर्फे कोश्यारी यांना देण्यात आले. नियमांचा काथ्याकूट न करता बाधितांना मदत द्यावी, अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आपण भेट देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नंतर माध्यमांना सांगितले.