मुंबई : निवृत्तीला आणखी दोन वर्षे शिल्लक असताना तसेच अन्य राज्यांतील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढतीही देण्यात येत असतानाही मुंबई उच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला.

वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे आपण मुंबई सोडण्यास इच्छुक नाही आणि याच कारणास्तव आपल्याला अन्य राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही बदली नको आहे, असे कारण न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी राजीनाम्यासाठी दिले आहे.

न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी बाराच्या सुमारास आपल्या न्यायदालनात आजचा आपला न्यायमूर्ती म्हणून शेवटचा दिवस असल्याचे सुनावणीसाठी हजर असलेल्या वकिलांना सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे सगळ्या विषयांची जाण असलेला उच्च न्यायालयातील एक चांगला न्यायमूर्ती निवृत्त झाल्याची खंत न्यायालयीन वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून खूप अपेक्षा असतात. परंतु अपेक्षित काम झाले नाही तर ते खूपच दु:खदायक असते. तसेच वयाच्या एका टप्प्यावर शरीर आणि कुटुंबाचे म्हणणेही ऐकावे लागते. ते ऐकले आणि राजीनाम्याचा निर्णय घेतला. 

      – न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी