राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनुत्पादक खर्च कमी करतानाच महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी उपलब्ध साधनांचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे ‘कॅग’च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असतानाच ‘कॅग’चा अहवाल बुधवारी विधानसभेमध्ये पटलावर ठेवण्यात आला.
या अहवालामध्ये वनक्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या आठ वर्षांत राज्य सरकारने ६८८१ कोटी रुपये खर्च केले. या खर्चानंतर वनक्षेत्रात वाढ होण्याऐवजी त्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. राज्यातील वनक्षेत्रात २२ चौरस किलोमीटर इतकी घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे वनक्षेत्र वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावर ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत.