शिक्षा सुनावल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने भर न्यायालयातच न्यायधीशांवर चप्पल फेकून मारली. बोरिवलीच्या कोर्ट नंबर ६८ येथे गुरूवारी दुपारी ही घटना घडली.    शिवशंकर अमरनाथ सिंग (२५) या आरोपीला एमएचबी पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात चोरी करताना रंगेहाथ अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. त्याला जामीन द्यायला कुणी आलेले नव्हते. त्यामुळे तो तुरुंगातच होता. गुरुवारी त्याच्या खटल्याचा निकाल लागणार होता. त्याला दुपारी बोरीवलीच्या न्यायालय क्रमांक ६८ येथे आणण्यात आले. आपण यापूर्वीच सहा महिने तुरुंगात काढले आहेत आणि न्यायालय आपली निदरेष सुटका करेल किंवा सौम्य शिक्षा देईल अशी त्याची अपेक्षा होती. परंतु न्यायाधीश आर व्ही ताम्हाणेकर यांनी सिंग त्याला एक वर्ष तुरुंगवास आणि ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अधिक तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने जवळच असलेली चप्पल न्यायाधीशांकडे भिरकावून मारली.