राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणातून रोखीच्या स्वरुपात कोटय़वधी रुपये मिळाले आणि ही रोकड हवालाद्वारे देशात तसेच परदेशातही पाठविण्यात आली. कोटय़वधी रुपये धनादेशाद्वारे भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या विविध उपकंपन्यांमध्ये आढळून आले असून या रकमेबाबतचा स्रोत सांगण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे ही रक्कम बेहिशेबी स्वरुपात मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानेच समीर यांच्यापाठोपाठ छगन भुजबळ यांना अटक करण्याचा निर्णय सक्तवसुली महासंचालनालयाला घ्यावा लागला आहे.
महासंचालनालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर भुजबळ यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे छगन भुजबळ यांना विचारण्यात आली. परंतु ११ तासांच्या चौकशीत त्यांनी टाळाटाळ केली. त्यांनी समीरकडे अंगुलीनिर्देश केला. त्यामुळे त्यांना अटक करून काका-पुतण्यांना एकमेकांसमोर प्रश्न विचारण्याशिवाय गत्यंतर न उरल्यानेच अटक हाच पर्याय होता. मटक्याच्या धंद्यातील हवाला ऑपरेटरचा रोख रक्कम अन्यत्र नेण्यासाठी वापर करण्यात आला. समीर व पंकज हे संचालक असलेल्या कुठल्याही कंपन्यांमध्ये छगन भुजबळ हे संचालक नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय सारा व्यवहार शक्य नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. काळापैसा प्रतिबंधक कायद्यातील कलम १९ (१) अन्वये महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांना कोणाही व्यक्तीला तो समाधानकारक उत्तरे देत नसल्यास अटक करण्याचे अधिकार आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले.११ जून २०१५ रोजी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र सदन व इतर दोन प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर महासंचालनालयाने १५ जून रोजी महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात काळा पैसा प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यानंतर भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या सर्व कंपन्या आणि उपकंपन्यांच्या बँकांच्या खात्यांचा तपशील मिळविला. याशिवाय भुजबळ कुटुंबीयांच्या एकूण मालमत्तेची माहिती घेतली. या तपशीलाच्या आधारावर तपास सुरू होता. तब्बल ८७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरुवातीला खारघर प्रकल्पातील ११७ कोटी किमतीचा भूखंड ताब्यात घेतला. नंतर वांद्रे, सांताक्रूझ आणि चर्चगेट येथील मालमत्ता ताब्यात घेऊन तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा माग काढण्यात यश मिळाले. उर्वरित बेहिशेबी मालमत्तेचा स्रोत काढण्यासाठी समीर व पंकज यांना प्रश्नावली पाठविली. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने समीर यांना १ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

छगन भुजबळांना अटक झाली आहे. यानंतर सिंचन घोटळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांनाही अटक व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.
-किरीट सोमय्या, खासदार, भाजप

* भुजबळांना अटक होणे हा षडयंत्राचा भाग असल्याची टीका विधानसभेचे गटनेते जयंत पाटील यांनी केली.
* भुजबळांच्या अटकेनंतर रात्री उशिरा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली.
* मंगळवारी विधीमंडळात भुजबळांच्या अटकेचा विषय उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.