मुंबई : सध्या भारतात १७ ते २० टक्के लोकांचा मृत्यू हा प्रतिबंधक उपाय होत नसल्याने होत असून जगात करोनासारख्या साथीमुळे हाहाकार उडाला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याच्यादृष्टीने रोग प्रतिबंधक व नियंत्रण संस्था महाराष्ट्रात स्थापन करण्याचा विचार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. सध्या अशाप्रकारची संस्था केवळ केंद्रीय पातळीवर दिल्लीत असून अशी संस्था उभारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल.

साथीचे रोग आरोग्यक्षेत्रासमोरील आव्हान असून कोरोनामुळे कोणत्याही प्रकारच्या साथींचा उद्रेक रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी यंत्रणेची गरज आहे. सध्या जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. जगात सर्वत्र आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. भारतात एकंदरच १७ ते २० टक्के रुग्णांचा मृत्यू हा प्रतिबंधात्मक उपाय वेळीच न झाल्यामुळे होतात. त्यामुळे राज्यात रोग प्रतिबंधक व नियंत्रण संस्था स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. सध्या हा विचार संकल्पना पातळीवर असून या संस्थेचे स्वरूप कसे असावे व इतर तपशील ठरवण्यासाठी संबंधितांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.

राज्यात सध्या २३ जिल्हा रुग्णालये आहेत. जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय योजना राबवण्याचा विचार मधल्या काळात पुढे आला होता. त्यासाठी प्रति जिल्हा रुग्णालय ४०० ते ५०० कोटी रुपये लागतील. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर जाण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. त्यातून वैद्यकीय क्षेत्राला मनुष्यबळ मिळेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी नमूद केले.  जे. जे. रुग्णालय परिसरात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठीची योजना अंतिम टप्प्यात असून निविदा प्रक्रिया लवकरच संपेल आणि त्याचे काम सुरू होईल, असे वैद्यकीय शिक्षणसंचालक तात्याराव लहाने यांनी सांगितले.

सरकारी रुग्णालयांसाठी २,००० कोटींची गरज

राज्यातील लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी पुरेसा औषधसाठा असावा, यंत्रसामुग्री व इतर साधने असावीत यासाठी सरकारी रुग्णालयांना एकूण दोन हजार कोटी रुपयांची गरज आहे. सध्या त्यापेक्षा बराच कमी निधी मिळतो. त्यामुळे सरकारी रुग्णालये सुरळीतपणे चालवण्यासाठी निधी वाढवून द्यावा याबाबत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही अमित देशमुख यांनी सांगितले. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांचा चेहरा-मोहरा पालटण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही अमित देशमुख म्हणाले.

जपान, दक्षिण कोरियाच्या नागरिकांना आगमनानंतर व्हिसा देणे भारताकडून बंद

टोकियो : जपान व दक्षिण कोरियात करोना विषाणूचा प्रसार मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याने या दोन देशांच्या नागरिकांना आगमनानंतर लगेच व्हिसा देण्याची सेवा भारताने तात्पुरती रद्द  केली आहे. भारतीय दूतावासाने येथे सांगितले, की एकूण ११९ भारतीय व ५ परदेशी नागरिकांना करोनाग्रस्त डायमंड प्रिन्सेस क्रूझ जहाजावरून भारतात  नेण्यात आले आहे. या जहाजावर ३७११ लोक होते व त्यातील ७०० लोकांची चाचणी  सकारात्मक आली होती. जपानमध्ये इतरत्र एकूण १६० जणांना विषाणूचा संसर्ग झाला असून दक्षिण कोरियात ही संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. चीननंतर दक्षिण कोरियात या विषाणूच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. एकूण १३ जण तेथे मरण पावले आहेत.