रेल्वे स्थानकांत, गाडीत करोना नियम पायदळी;  प्रवाशांसह रेल्वे स्टॉल कर्मचारी आणि पोलिसांनाही विसर;  तिकीट खिडक्या, एटीव्हीएमवर शारीरिक अंतराचाही फज्जा

मुंबई : करोना संसर्ग रोखण्यासाठी बंधनकारक केलेले नियम रेल्वे प्रवासात पायदळी तुडविले जात असून के वळ प्रवासीच नव्हे तर रेल्वे फलाटांवरील स्टॉलचे मालक-कर्मचारी, सुरक्षेसाठी तैनात पोलिसांकडूनही या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, लोकल गाडय़ा, रेल्वे स्थानकांमधील गर्दी धोक्याची ठरू लागल्याचे चित्र आहे.

करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुणे हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. मात्र रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवासी या नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी मर्यादित वेळेत उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर अनेकांनी स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच तिकीट खिडक्या आणि एटीव्हीएमवर तिकीट मिळवण्यासाठी गर्दी होत आहे. ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रासह विक्रोळी, घाटकोपर, कु र्ला, दादर, महालक्ष्मी, वांद्रे, खार, सांताक्रू झ, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. रेल्वे प्रशासनाला गर्दीचे नियोजन करण्याचा, तर प्रवाशांना करोनाविषयक नियमांचा विसर पडल्याचे चित्र तेथे पाहावयास मिळते.

लोकलमधून प्रवास करताना किं वा पादचारी पूल, फलाटावर उभे असलेले काही प्रवासी मुखपट्टी हनुवटीवर ठेवून गप्पांच्या फडात सहभागी झाल्याचे दृष्टीस पडते. स्थानकात उपस्थित रेल्वे पोलिसांकडूनही अशा प्रवाशांना हटकले जात नाही. उलट काही लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारीही मुखपट्टी खाली सरकवून चर्चा करीत असतात. फलाटावरील खाद्यपदार्थाच्या स्टॉलमधील कर्मचारीही मुखपट्टीच्या नियमाचे पालन करीत नाहीत. ग्राहकाला खाद्यपदार्थ देतानाही कर्मचारी मुखपट्टीविनाच असतो. तिकीट खिडक्यांवर तिकीट घेण्यासाठी प्रवासी शारीरिक अंतर न ठेवता गर्दी करतात. एटीव्हीएमवर तिकीट देणारे मदतनीसही नियमांचे पालन करीत नाहीत.

प्रवाशांकडूनच अस्वच्छता

करोनाकाळात स्वच्छतेला अधिकच प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र प्रवाशांकडूनच स्वच्छतेला तिलांजली दिली जाते. अनेक स्थानकांत फलाटावर उभे असलेले प्रवासी कोपऱ्यांतील जागा बघून थुंकतात. तर रुळांवरही पानाच्या पिचकाऱ्या मारतात. लोकल प्रवासादरम्यानही काही प्रवाशांकडून हेच प्रकार के ले जाते. परंतु स्थानकात उपस्थित रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून या प्रवाशांना हटकलेही जात नाही.

अनेक रेल्वे स्थानकांत प्रवासी मुखपट्टीचा वापर करताना दिसत नाहीत. तर तिकीट खिडक्यांवरही गर्दी करताना शारीरिक अंतर ठेवत नाहीत. करोनाकाळ पाहता प्रवाशांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. परंतु नियमांना हरताळ फासणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारायला हवा. शिवाय शासन व पालिके ने नियम आखून दिले आहेत. रेल्वेनेही त्यांच्याशी समन्वय साधून कारवाई करावी, पण त्यांच्याकडूनही ते होताना दिसत नाही.

– लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ