लोकल नसल्याने नोकरदारांचे हाल; रस्तेमार्गे कार्यालय गाठताना दमछाक; खड्डे, मेट्रोची कामे, वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वाहतूक कोंडी

मुंबई : लोकलमधून सामान्यांना प्रवासाची परवानगी नसल्याने रस्ते प्रवासाचाच असलेला पर्याय, बेस्ट मार्गावर बंद के लेल्या एसटी सेवा, बस थांब्यांवर असलेल्या लांबच लांब रांगा, त्यातच खासगी वाहन घेऊन जातानाही खड्डे व मेट्रोच्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी.. निर्बंध शिथिलीकरणानंतर घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर असा प्रवास करणारा नोकरदार वर्ग गेले महिनाभर या फेऱ्यात अडकला आहे. ठाणे, वसई, नवी मुंबई या शहरांच्याही पुढील भागांतून येणाऱ्या प्रवाशांना दिवसाचे चार ते सहा तास प्रवासात खर्च करावे लागत आहेत. हा वेळ खर्ची होत असताना वाहतूक कोंडीमुळे मनस्तापही वाढला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकल प्रवासावर निर्बंध आले. अत्यावश्यक सेवांशिवाय सामान्यांना प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली. बेस्टमधून फक्त ५० टक्के  प्रवासी वाहतूक करण्याची मुभा आहे. रिक्षा, टॅक्सीमधील प्रवासी वाहतुकीवरही मर्यादा आहेत. वाहतुकीवर मर्यादा असल्या तरी बहुतांश खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात येणे सक्तीचे केले आहे. छोटय़ा-मोठय़ा कारखान्यांत, उद्योगांत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गालाही कामावर नित्य जाणे गरजेचे आहे. या सर्वाचा लोंढा रस्त्यांवर आल्याने रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण आला आहे.

सांताक्रू झ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी ते कु र्ला रोड, सहार रोड, जोगेश्वरी-विक्र ोळी लिंक रोड व परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे येथून जाणाऱ्या वाहनांची गती नेहमीच मंदावते. हीच परिस्थिती ठाण्यातील कोपरी, मुलुंड चेकनाका आणि घाटकोपर छेडानगर पार करेपर्यंत असते. मेट्रो कामांमुळे तर अनेक ठिकाणी एकच मार्गिका मिळत असल्याने तो मार्ग पार करेपर्यंत दुचाकी, चारचाकींसह अन्य वाहनांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच अनेक रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे कोंडीत भर पडते.

बनावट ओळखपत्रांचा आधार

सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल आहे. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून सध्या दहा ते १३ लाखांदरम्यान प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. तर मध्य रेल्वेवर हीच संख्या १८ लाखांपर्यंत आहे. काही सामान्य प्रवासी लोकल प्रवासाचा प्रयत्न करतात. परंतु तिकीट तपासनीसाच्या जाळ्यात अडकताच सध्याच्या रेल्वे नियमानुसार ५०० रुपये दंड घेतला जात आहे. काही जण प्रवासासाठी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्रही बाळगतात. २८ एप्रिल ते आतापर्यंत बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या तीन हजार प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडील ओळखपत्रही जप्त के ले आहे.

बेस्ट प्रवासी संख्येत वाढ

७ जूनपासून निर्बंध शिथिल करण्यात आले व ५० टक्केवरून पूर्ण प्रवासी क्षमतेने बस चालवण्याची परवानगी दिली.  सरकारी व खासगी कार्यालयातील उपस्थितीतही वाढ झाली. त्यामुळे ७ जूनला १५ लाख ९१ हजार असलेल्या प्रवासी संख्येत वाढ होऊन ती आता २० लाखांहून अधिक झाली आहे.   बेस्टवरील ताण वाढला आहे.

प्रवासी म्हणतात..

कामानिमित्त दररोज मुलुंड ते वांद्रे असा बेस्ट, एसटीने प्रवास करत होतो. परंतु एसटी गाडय़ा बंद के ल्यामुळे बेस्ट बस थांब्यावर गर्दी वाढली आहे. अर्धा ते पाऊण तास बसची वाट पाहण्यात जातो. उभ्याने प्रवास नसल्याने दुसऱ्या बसची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो.  मेट्रो कामे, खड्डे आदींमुळे  प्रवास वेळ लांबतो.

– के दार गोगटे, प्रवासी

आधी लोकलने घाटकोपपर्यंत आणि नंतर मेट्रो पकडून अंधेरी असा झटपट प्रवास होत होता; परंतु दुसऱ्या लाटेत पुन्हा निर्बंध आल्याने खासगी वाहनाने कार्यालय गाठण्याशिवाय पर्याय राहिला नाही.मुलुंड चेक नाका व पुढे जोगेश्वरी-विक्र ोळी लिंक रोड पार करेपर्यंत मोठी कसरत करावी लागते.

– विवेक भांडीगरे, प्रवासी