सौरभ कुलश्रेष्ठ

करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे एप्रिल ते जून २०२० या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्राला निम्म्या महसुलावर पाणी सोडावे लागले. पहिल्या तिमाहीत राज्याला ८४ हजार कोटींचा महसूल अपेक्षित असताना प्रत्यक्षात सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

राज्याच्या तिजोरीत वस्तू व सेवा कर, पेट्रोलियम पदार्थावरील विक्रीकर, मद्यावरील उत्पादन शुल्क अशा विविध माध्यमांतून महसूल जमा होतो. राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला तेव्हा दरमहा सुमारे २८ हजार कोटी रुपयांचा महसूल विविध करांतून मिळेल, असा अंदाज होता. त्या हिशेबाने एप्रिल ते जून २०२० या पहिल्या तिमाहीत ८४ हजार कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. पण, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लागू झालेल्या टाळेबंदीमुळे जनजीवन-अर्थचक्र  थांबले. त्याचा मोठा परिणाम महसुलावर झाला असून, सुमारे ४२ हजार कोटी रुपये म्हणजे निम्मेच उत्पन्न राज्याच्या तिजोरीत जमा झाले.

गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ६३ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार पहिल्या तिमाहीत वस्तू व सेवा कर, पेट्रोलियम पदार्थावरील विक्रीकर, व्यवसाय कर यातून ३९ हजार ७२४ कोटी रुपयांचा महसूल गोळा होण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात अवघे १६ हजार ४४५ कोटी रुपये जमा झाल्याने २३ हजार २७९ कोटी रुपयांचा फटका बसला. उत्पादन शुल्कातून ४८०० कोटींची अपेक्षा असताना अवघे १२५० कोटी रुपये जमा झाले. याशिवाय के ंद्रीय करातील वाटा, वस्तू व सेवा कराची भरपाई अशा माध्यमांतून राज्याला १९ हजार ९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तो सुमारे ४० हजार कोटी रुपये अपेक्षित होता, असे समजते.

टाळेबंदीमुळे एप्रिल व मे महिन्यात जनजीवन ठप्प असल्याने व्यवहारांअभावी तिजोरीला हा फटका बसला. जूनच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र सरकारने जनजीवन व अर्थचक्राला गती देण्यासाठी ‘पुनश्च हरि ओम’ या संकल्पनेसह टाळेबंदीतून शिथिलता दिली. त्यामुळे महसूल वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल व मे महिन्यात वस्तू व सेवा कर, इंधन विक्रीवरील कर आदींमधून एकू ण ८ हजार कोटी रुपयेच मिळाले होते.

टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर एकटय़ा जूनमध्ये त्यातून ८४०० कोटी रुपये मिळाले. उत्पादन शुल्कातही १२५० कोटी रुपयांपैकी ८५० कोटी रुपये एकटय़ा जूनमध्ये मिळाले, असे आकडेवारीवरून दिसून येते.

जुलैमध्येही उत्पन्नघट?

राज्याला पहिल्या तिमाहीत मिळालेल्या ४२ हजार कोटींपैकी १९ हजार २५० कोटींचा महसूल एकटय़ा जून महिन्यात मिळाला. जूनमध्ये टाळेबंदी शिथिल करण्यात आल्याने अर्थचक्र सुरू झाले होते. व्यवहार सुरू होऊन राज्याला चांगला महसूल मिळू लागला होता. मात्र, जुलैमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील अनेक महापालिका, पुण्यासह विविध शहरांत पुन्हा टाळेबंदीसत्र सुरू झाले. त्यामुळे जुलैमध्ये पुन्हा तिजोरीला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

टाळेबंदीमुळे एप्रिल आणि मे महिन्यात राज्याच्या तिजोरीत अत्यल्प उत्पन्न जमा झाले होते. मात्र, जूनमध्ये परिस्थिती थोडी सुधारली आणि उत्पन्न वाढण्यास सुरुवात झाली.

– मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव, अर्थ विभाग