News Flash

‘नीट’नाटकाचा गोंधळ सुरूच!

पुढील वर्षीपासून देशभरात सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ हीच परीक्षा सक्तीची राहणार असून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्यातील गुणांच्या आधारेच प्रवेश होतील.

नीट पुढे ढकलली जाण्याचे वृत्त पसरताच शनिवारी वैद्यकीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या आनंदाला उधाण आले. काहींनी तर थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना गाठून जल्लोष साजरा केला. (छाया : गणेश शिर्सेकर)

अध्यादेश काढला तरी विद्यार्थ्यांची ससेहोलपट टळणे कठीण
‘नीट’ सक्ती वर्षभर लांबणीवर टाकून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याचे जाहीर होताच वैद्यकीय विद्यार्थी त्यांचे आप्त यांच्या आनंदाला उधाण आले. पण या अध्यादेशात नेमके आहे तरी काय, हे स्पष्ट झाले नसतानाच महाराष्ट्रात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश राज्य सरकारच्या प्रवेशपरीक्षेतील (सीईटी) गुणांनुसार होतील मात्र खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी होणारी ‘नीट’ परीक्षा देणे सक्तीचे राहणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. त्यामुळे ‘नीट’ नाटकाचा गोंधळ सुरूच असून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावीच लागणार असल्याने एवढा आटापिटा करुनही केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानेच पुसली काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
आता सरकारी महाविद्यालयांत प्रवेशाची खात्री नसल्याने विद्यार्थी खासगी महाविद्यालयांसाठीही परीक्षा देतात, हे लक्षात घेतले तर विद्यार्थ्यांना या अध्यादेशानेही खरा दिलासा मिळणारच नसल्याचे दिसत आहे. त्यातच हा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून या अध्यादेशाला आव्हान देण्यात आले आहे.
पुढील वर्षीपासून देशभरात सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ हीच परीक्षा सक्तीची राहणार असून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्यातील गुणांच्या आधारेच प्रवेश होतील. खासगी व अभिमत विद्यापीठांचे प्रवेश ‘नीट’ नुसार होणार असल्याने त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग व वेबसाइटच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याची योजना सुरूच राहणार आहे, असेही तावडे यांनी जाहीर केले. नीटच्या निर्णयाबद्दल तावडे यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
खासगी वैद्यकीय महाविद्यालये व अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशसाठी गैरप्रकार होतात. विद्यार्थ्यांकडून कोटय़वधी रुपये उकळून त्यांच्यामार्फत होणाऱ्या खासगी प्रवेशपरीक्षांमध्ये गुण बहाल करून प्रवेश दिले जातात. या गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी आणि देशपातळीवर समान परीक्षा असावी, या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ सक्ती केली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षीसाठी पैसे घेऊन ठेवलेल्या खासगी संस्थाचालकांकडे पालकांनी पैसे परत करण्याचा तगादाही लावला आहे. देशभरातील विद्यार्थी व पालकांचा दबाव आणि सर्वपक्षीय नेत्यांची मागणी यामुळे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या ‘नीट’ सक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी वर्षभराने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा हे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन या अध्यादेशासंदर्भात चर्चा करणार आहेत.

निर्णयामागे राजकारण?
महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपव्यतिरिक्त अन्य पक्षांच्या नेत्यांची वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामुळे या संस्थाचालकांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तसे वक्तव्य केले होते. मात्र खासगी महाविद्यालयांना व अभिमत विद्यापीठांना ‘नीट’ ऐवजी राज्य सरकारची सीईटीच सक्तीची करण्याची मागणी होत आहे.

..तर खासगी महाविद्यालयांनाही सीईटी
केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार केवळ सरकारीच नव्हे, तर सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांसाठी नीटची अंमलबजावणी एक वर्ष पुढे ढकलली, तर महाराष्ट्रात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठीही राज्य सरकारच्या प्रवेशपरीक्षेच्या (सीईटी) आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ‘नीट’ की राज्याची सीईटी हे अध्यादेशामधील तरतुदीवर अवलंबून असेल, असे सांगत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गोंधळात आणखी भरच घातली. हा तिढा रात्री उशिरापर्यंत कायम होता.

दिलासा केवळ दिला असा..
* ज्या विद्यार्थ्यांना केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतच प्रवेश घ्यायचा आहे किंवा त्यांच्या पालकांची तशी आर्थिक परिस्थिती आहे, त्यांना राज्याच्या सीईटी आधारेच प्रवेश मिळणार असल्याने ‘नीट’ देण्याची सक्ती नाही.
* मात्र ज्या विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न मिळाल्यास खासगी व अभिमत विद्यापीठांमध्येही प्रवेशासाठी प्रयत्न करायचे आहेत, त्यांना मात्र २४ जुलै रोजी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेचा अभ्यास करावा लागेल.
* अनेक खासगी महाविद्यालयांमध्ये गैरप्रकारांच्या माध्यमातून हे प्रवेश निश्चित होतात, याची सर्वाना कल्पना असली तरी लाखो विद्यार्थी खासगी व अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशाचे प्रयत्न करतात आणि प्रवेशपरीक्षा देतात. त्यामुळे अशा लाखो विद्यार्थ्यांना ‘नीट’ शिवाय पर्याय राहिलेला नाही.

हे लक्षात घ्या
* सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय व दंतवैद्यकीच्या जागा – २८१०
* राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा-१७२०, अभिमत विद्यापीठांमधील जागा १६७५- या एकूण ३३७५ जागांवर ‘नीट’ च्या गुणांनुसारच होणार प्रवेश

पाठीत खंजीर !
केंद्र सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी व भविष्याशी खेळ करू नये. अध्यादेशानंतर संभ्रम संपण्याऐवजी वाढला आहे. खासगी महाविद्यालयांचे प्रवेश सरकारच्या सीईटीमार्फतच व्हावेत. हा निर्णय घेतला जाईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहील, असे पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 2:12 am

Web Title: govt clears ordinance to keep states out of neet ambit this year
टॅग : Vinod Tawde
Next Stories
1 ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ अग्रलेखावर व्यक्त व्हा!
2 वारंवार वाहतूक नियमभंग करणाऱ्यांची नोंद होणार!
3 ‘बेस्ट’चा वातानुकूलित प्रवास सर्वात महाग
Just Now!
X