13 July 2020

News Flash

इतिहास म्हणजे माणसाची ओळख

* राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे मत * मुंबई विद्यापीठात भारतीय इतिहास परिषदेचे उद्घाटन इतिहास हा विविध पैलू असलेला विषय आहे. माणसाने आतापर्यंत जे सांगितले, केले आणि विचार

| December 29, 2012 06:56 am

* राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे मत
* मुंबई विद्यापीठात भारतीय इतिहास परिषदेचे उद्घाटन
इतिहास हा विविध पैलू असलेला विषय आहे. माणसाने आतापर्यंत जे सांगितले, केले आणि विचार केला ते सर्व इतिहास या विषयात समाविष्ट होते. इतिहास म्हणजे माणसाची ओळखच आहे, या शब्दांत राज्यपाल व मुंबई विद्यापीठाचे कुलपती के. शंकरनारायणन यांनी इतिहास या विषयाचे महत्त्व विशद केले. ते ७३ व्या भारतीय इतिहास परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. ही परिषद यंदा मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आली असून जगभरातून इतिहास विषयाचे २५०० तज्ज्ञ आणि विद्यार्थी या परिषदेला हजेरी लावणार आहेत. पुढील तीन दिवस तब्बल एक हजार विद्यार्थी संशोधन प्रबंध सादर करणार आहेत.
या परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या आधी राज्यपालांचे स्वागत मोठय़ा दिमाखात करण्यात आले. राज्यपालांची मिरवणूक कालिना विद्यापीठ परिसरातील क्रीडा संकुलापर्यंत रथातून काढण्यात आली. त्याचप्रमाणे या वेळी पारंपरिक लेझीम नृत्यही सादर करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. त्यानंतर नंदेश उमप आणि त्यांच्यासह इतर कलाकारांनी ‘महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत सादर केले. नगारा वाजवून आणि घंटानाद करून राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी या परिषदेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करत मुंबई विद्यापीठाला या परिषदेचे यजमानपद भूषविण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ देशातील तिसऱ्या क्रमांकाचे जुने विद्यापीठ असून विद्यापीठाला इतिहास परिषदेचे यजमानपद भूषविण्याचा मानही तीन वेळा मिळाल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. त्यानंतर यंदाच्या इतिहास परिषदेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. बी. बी. चौधरी यांच्या हातून डॉ. वाय. सुब्बुरायलू यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सुब्बुरायलू पुढील वर्षी होणाऱ्या इतिहास परिषदेचे अध्यक्षपद भूषवतील.
या प्रसंगी उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री डॉ. राजेश टोपेही उपस्थित होते. राष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक इमारतीचा पाया म्हणजे इतिहास, असे त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाला जगातील ५०० सर्वश्रेष्ठ विद्यापीठांमध्ये स्थान देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2012 6:56 am

Web Title: history means recognization of human
टॅग History,Human
Next Stories
1 सोनियांच्या योजनेवर शरद पवारांची तोफ!
2 मुंब्य्राजवळ सिग्नल्स बंद पडल्याने मध्य रेल्वे दिवसभर विस्कळीत
3 छत्रपती शिवाजी टर्मिनसची वारसा वास्तू पर्यटकांसाठी खुली
Just Now!
X