शनिवारी संध्याकाळी पाच वाजता जोरदार आलेल्या वादळीवाऱ्या व पावसाने शेकडो झाडे रस्त्यावर, अनेकांच्या घरांवर, वाहनांवर उन्मळून पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळीवाऱ्याने अनेक घरांचे पत्रेही उडाले आहेत. अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. काही ठिकाणी वीज पडून घरांचे, सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झालेली नाही.
वाडा ग्रामीण रुग्णालयातील चार मोठे वृक्ष पडून विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) व काही टपऱ्यांचे नुकसान झाले आहे. पोलीस कार्यालय व तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वीज कोसळल्यामुळे येथील संगणकीय संच बिघडले आहेत. या ठिकाणची अनेक झाडेही मोडून पडली आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आवारातील गुलमोहराची भली मोठी झाडे उन्मळून मुख्य रस्त्यावर पडल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसवर दोन झाडे पडल्याने बसचेही नुकसान झाले आहे. मात्र त्यामधील कुणीही प्रवासी जखमी झालेला नाही.