ग्रॅन्टरोड, वरळी, वांद्रे पश्चिम, अंधेरी परिसरात नवी ठिकाणे

मुंबई : गेल्या दोन वर्षांत मुंबईत पावसाचे पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत ज्या ठिकाणी कधी पाणी भरले नाही, अशाही ठिकाणी पाणी भरले होते. त्यामुळे या दोन वर्षांत मुंबईत पाणी साचण्याची तब्बल २७१ ठिकाणे वाढली आहेत, असे आकडेवारीवरून पुढे आले आहे. मुंबईतील सर्वच विभागांत अशा ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे. त्यातही ग्रॅन्टरोड, वरळी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी या परिसरांत सर्वाधिक पाणी साचण्याची नवी ठिकाणे आढळून आली आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत १०० टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे. मात्र या दोन वर्षांत मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे वाढली असल्याचे आढळून आले आहे. गेल्यावर्षी झालेल्या पावसात मंत्रालय, मुंबई विद्यापीठ आणि उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी अशा भागांतही पावसाचे पाणी साचले होते. तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पालिकेची संपूर्ण यंत्रणा हिंदमाता येथील पूरस्थितीवर उत्तर शोधण्यात गुंतलेली असताना मुंबईतील अनेक भागही आता पाण्याखाली जाऊ लागले आहेत. ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही पाणी भरत नव्हते, अशा ठिकाणीही गेल्या दोन वर्षांत पावसाचे पाणी साचू लागले आहेत. त्यामुळे नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी गेल्या दोन वर्षांत मुंबईत मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेली विकासकामांमुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत दरवर्षी पाणी तुंबले की अतिवृष्टीला जबाबदार धरले जाते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दक्षिण मुंबईत सरासरी ३०० मिलिमीटर पाऊस चार तासांत पडल्यामुळे जागोजागी पाणी भरल्याचे सांगितले जात होते. मुंबईत कुठेही कितीही पाऊस पडला तरी मंत्रालय आणि ओव्हल मैदानाचा परिसर, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह या परिसरात कधीही पाणी भरत नाही, अशी या भागाची ख्याती आहे. मात्र हे भागही जलमय झाले होते. गिरगाव चौपाटीहून मलबार हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतके  पाणी जमले होते की रस्ता संपून समुद्रकिनारा कु ठून सुरू होत आहे तेच कळत नव्हते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

गेल्यावर्षीच्या अनुभवानंतर पालिके ने या वर्षभरात मुंबईत विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे यापैकी काही ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात अद्याप पाणी भरलेले नाही. ग्रॅंटरोड परिसरात गिरगाव चौपाटी, बाबूलनाथ, नेपियन्सी रोड तर चर्चगेट परिसरात मंत्रालय, नरिमन पॉइंट अशा काही परिसरांना यावर्षी दिलासा मिळाला आहे.

पर्जन्यवाहिन्यांना धक्का

२६ जुलै २००५ च्या पावसानंतर पालिके ने ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत हाजिअली, ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅण्ड, ईर्ला ही पाच उदंचन केंद्रे उभारली. तसेच पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमताही वाढवण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षांत मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे अनेक ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांना धक्का लागला आहे, तर कु ठे बांधकामाचा राडारोडा अडकल्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या बुजल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा वेळीच होऊ शकत नाही.