News Flash

काळबादेवी येथील दुर्घटनेत अनेक त्रुटी

काळबादेवी येथील ‘गोकुळ हाऊस’ दुर्घटनाप्रकरणी चौकशी समितीला अनेक त्रुटी आढळून आल्या असून, भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून धोकादायक इमारतींची पाहणी करून त्यांच्या विरोधात कठोर

| June 1, 2015 02:57 am

काळबादेवी येथील ‘गोकुळ हाऊस’ दुर्घटनाप्रकरणी चौकशी समितीला अनेक त्रुटी आढळून आल्या असून, भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून धोकादायक इमारतींची पाहणी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे. तसेच छोटय़ा गल्ल्यांमध्ये दुर्घटना घडल्यास मदतकार्यांमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केल्याचे उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नियोजित वेळेत चौकशी पूर्ण केली असून, सोमवारी हा अहवाल आयुक्त अजय मेहता यांना सादर केला जाणार आहे. नियोजित वेळेत अहवाल सादर करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ आहे.  
‘गोकुळ हाऊस’ इमारतीला ९ मे रोजी दुपारच्या सुमारास आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी-जवान शर्थीचे प्रयत्न करीत होते. लाकडी बांधकामामुळे ही इमारत आगीच्या विळख्यात अडकली होती.  या दुर्घटनेत अग्निशमन दलाने धडाडीचे चार अधिकारी गमावले. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते.
पालिकेतील अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा; उपायुक्त, मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण (अग्निशमन सेवा); प्रमुख अभियंता, यांत्रिकी व विद्युतीकरण; संचालक, अभियांत्रिकी व सेवा; प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) यांची सदस्य म्हणून, तर प्रमुख अधिकारी, आपत्कालिन व्यवस्थापन विभाग यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या समितीला तीन आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या समितीने तीन उपसमित्या स्थापन करून नियोजित तीन आठवडय़ांमध्ये अहवाल तयार केला आहे.
या दुर्घटनेमध्ये मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आणि काही त्रुटी आढळून आल्या आहेत. जीर्ण झालेल्या इमारती, त्यामध्ये सुरू असलेले व्यवसाय, चिंचोळे रस्ते, वाहतुकीची वर्दळ आदी विविध मुद्दय़ांचा अहवालात उहापोह करण्यात आला आहे. समितीने अहवालात काही शिफारशीही केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 2:57 am

Web Title: kalbadevi fire probe
Next Stories
1 निवृत्तीनंतरही ढोबळे यांना विश्रांती नाहीच..
2 खासगी प्रॅक्टिस केल्यामुळे ‘जे. जे’. तील डॉक्टर निलंबित
3 पालिकेतील निवृत्तांची ‘विशेष कार्य अधिकारी’ सेवा आजपासून संपुष्टात
Just Now!
X