चार व्हेल शरकनाही वाचवले; मच्छीमारांना जाळे नुकसानभरपाईपोटी दोन लाख

मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या समुद्रातील प्रतिबंधित प्रजाती संरक्षणाच्या योजनेत गेल्या पाच महिन्यांत १७ ऑलिव्ह रिडले कासवे, चार व्हेल शार्क आणि एक समुद्री कासव वाचवण्यात यश आले आहे.

समुद्रातील प्रतिबंधित मासे, कासव व इतर समुद्री जीव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यानंतर जाळे तोडून त्या जीवांना समुद्रात सोडण्याबाबत मच्छीमारांना विशेष नुकसानभरपाई देण्याच्या योजनेत गेल्या पाच महिन्यांत या कासवांना वाचवण्यात आले. त्या बदल्यात आत्तापर्यंत जाळ्याच्या नुकसानभरपाईपोटी १० प्रकरणांमध्ये दोन लाख रुपये मच्छीमारांना देण्यात आले.

वन्यजीव कायद्यानुसार समुद्रातील प्रतिबंधित तसेच दुर्मीळ सागरी जीव मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्यानंतर ते पुन्हा समुद्रात सोडायचे तर जाळे तोडूनच सोडावे लागते. अशा वेळी मच्छीमारांचे नुकसान होते. त्यासाठी नुकसानभरपाईपोटी २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्याच्या योजनेचा अध्यादेश डिसेंबर २०१८ मध्ये काढण्यात आला. त्यानुसार पहिल्या दोन प्रकरणांना जून महिन्यात नुकसानभरपाई देण्यात आली. त्यानंतर या योजनेबाबत कांदळवन कक्ष आणि मत्स्य विभागाने केलेल्या जनजागृती मोहिमेमुळे गेल्या पाच महिन्यांत २२ प्रकरणांमध्ये जाळे तोडून प्रतिबंधित जीव समुद्रात सोडण्यात आले.

गेल्या पाच महिन्यांत १० वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नऊ ऑलिव्ह रिडले आणि एक समुद्री कासव यांना जीवदान मिळाले आहे. या प्रकरणांमध्ये नुकसानभरपाईपोटी दोन लाख सहा हजार ७५० रुपये मच्छीमारांना देण्यात आल्याचे मुंबई कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे मच्छीमार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आहेत. या योजनेला मच्छीमारांचा वाढता प्रतिसाद असून अजून १२ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यामध्ये चार व्हेल शार्क (देव मुशी/बहिरी) मासे, आठ ऑलिव्ह रिडले कासवांचा समावेश आहे.

समुद्री कासवे आणि अन्य दुर्मीळ जीवांच्या संवर्धनासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जाळे तोडण्याच्या व समुद्री जीव परत सोडण्याच्या घटनेची सत्यता तपासण्याचे काम राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडे असून तपासणीनंतर कांदळवन कक्ष मुंबई यांच्याकडून भरपाईची रक्कम दिली जाते. कांदळवन विभागाकडून मच्छीमारी बंदीच्या दोन महिन्यांत संपूर्ण किनारपट्टीवर या संदर्भात जनजागृतीचे उपक्रम राबवले होते.

गेल्या पाच महिन्यांत १० वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नऊ ऑलिव्ह रिडले आणि एक समुद्री कासव यांना जीवदान मिळाले आहे. या प्रकरणांमध्ये नुकसानभरपाईपोटी दोन लाख सहा हजार ७५० रुपये मच्छीमारांना देण्यात आल्याचे मुंबई कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अति दुर्मीळ लेदर बॅक समुद्री कासवांची नोंद

आपल्याकडे लेदर बॅक कासवांची यापूर्वीची नोंद १९९५ ची आहे. काही प्रमाणात अंदमानला ही प्रजाती आढळते. कांदळवन कक्षाकडून सुरू असलेल्या जनजागृतीमुळे मच्छीमार अशा कासवे सोडून देत आहेत. त्यापैकी एका प्रकरणात काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन येथील भरडखोल गावाजवळ एका मच्छीमाराच्या जाळ्यात लेदर बॅक समुद्री कासव सापडले होते, मात्र त्यांनी जाळे तोडून सोडून दिले. त्यांनी अजून याबद्दल भरपाईसाठी अर्ज केलेला नाही.

प्रतिबंधित प्रजाती

व्हेल शार्क (देव मुशी/बहिरी) करवत मासा, भेरा, खादर, हेकरु/गोब्रा, काटेदार पाकट, लांजा/रांजा, ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव, हॉक्सबील कासव, लेदर बॅक सी कासव, डॉल्फिन, देवमासा, स्पर्म व्हेल, बुडीज व्हेल, हम्प बॅक व्हेल.