मनसुख हिरेन हत्या प्रकरण, वाझे मुख्य आरोपी – एटीएसचा दावा

मुंबई : व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जन्मठेपेची शिक्षा भोगणारा निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि सट्टेबाज नरेश गोर या दोघांना रविवारी अटक केले. न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून मनसुख यांची हत्या करण्यात या आरोपींनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना सहकार्य के ल्याचे ‘एटीएस’ने न्यायालयाला सांगितले.

अटक आरोपींनी मनसुख यांच्या हत्येसाठी वाझेंना वाहने, मोबाइल आणि सिम कार्ड पुरवण्यासह सहकार्य के ल्याची माहिती तपासातून पुढे आली. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाइल, आठ सिम कार्डे ताब्यात घेण्यात आली. त्यापैकी गुन्ह्य़ात वापर झालेल्या मोबाइल, सिम कार्डबाबत तपास सुरू आहे. तसेच वाहनांचाही शोध घेतला जात आहे, असे एटीएसतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

अटक आरोपींपैकी गोर हा क्रिकेटवर सट्टा लावणारा असून शिंदे  रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्याकांडातील आरोपी असून त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने  गेल्या वर्षी मे महिन्यात शिंदेही कारागृहाबाहेर आला. त्यानंतर तो सतत वाझेंच्या संपर्कात होता. वाझेंच्या बेकायदेशीर कामांमध्ये सहकार्य करत होता, असे एटीएस प्रवक्त्यांनी सांगितले.

हत्येपूर्वी मनसुख यांच्याशी पोलीस अधिकारी तावडे या नावाने  शिंदेने संपर्क साधला होता. त्यासाठी गोर याने  प्राप्त केलेल्या सीमकार्डचा वापर करण्यात आला. मनसुख यांच्या हत्येची पूर्वतयारी, हत्या, मृतदेहाची विल्हेवाट आणि पुरावे नष्ट करणे या प्रत्येक टप्प्यावर शिंदे याचा सहभाग पुढे येत असल्याचे एटीएस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वाझे आरोपी : अंबानी धमकी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत असलेले वाझे यांचा उल्लेख रविवारी मनसुख हत्या प्रकरणात  ‘वॉण्टेड ’असा के ला. मनसुख हत्या प्रकरणाचा तपास हाती आल्यापासून एटीएसने वाझे यांची अटक आणि कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, अशी भूमिका न्यायालयात मांडली होती.

लखनभैय्या प्रकरण..

गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या लखनभैयाला वसरेवा येथील नाना-नानी पार्क येथे चकमकीत ठार के ल्याचा आभास तत्कालीन पोलीस पथकाने उभा के ला. प्रत्यक्षात या घटनेच्या काही दिवस आधीच लखनभैया आरोपी पोलीस पथकाच्या ताब्यात होता. नोव्हेंबर २००६ मध्ये त्याचे नवी मुंबईतून अपहरण करण्यात आले होते. या अपहरणनाटय़ात विनायक शिंदे एकटा पोलीस कर्मचारी होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रेल्वे मोबाइल न्यायालयास चौकशीचे आदेश दिले.  न्यायालयाने लखनभैयाची हत्या करून चकमकीचा आभास उभा के ल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवले. त्याआधारे उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक नेमले. या पथकाने  २२ आरोपींना अटक के ली. त्यात  प्रदीप शर्मा यांचाही समावेश होता. शर्मा वगळता उर्वरित २१ आरोपींना सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.

‘मनसुख महत्त्वाचे साक्षीदार’

मृत मनसुख हिरेन यांचा ‘महत्त्वाचे साक्षीदार’ असा उल्लेख एटीएसने के ला. उद्योगपती मुके श अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला स्फोटके , धमकीची चिठ्ठी सापडलेली बेवारस स्कॉर्पिओ गाडी मनसुख यांची होती. ती गाडी १७ फेब्रुवारीला चोरी झाल्याची तक्रोर मनसुख यांनी विक्र ोळी पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलीस आयुक्तालयाने तपासाची जबाबदारी वाझे यांच्याकडे दिली. वाझे आणि मनसुख मित्र होते, तसेच स्कॉर्पिओ गाडी चार महिने वाझे वापरत असल्याची माहिती उघड होत गेली. मात्र ५ मार्चला मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत रेती बंदर येथे सापडला. हिरेन कु टुंबाने मनसुख यांची हत्या वाझे यांनी  के ल्याचा संशय वर्तविला. त्याआधारे एटीएसने ७ मार्चला हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू के ला. गाडी चोरीची तक्रोर मनसुख यांनी वाझेंच्या सांगण्यावरून के ली, असा संशय एटीएसला आहे.