चार ठिकाणच्या प्रायोगिक प्रकल्पाला यश; दररोज ४२ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईसह चार मंडयांमधील हरित कचऱ्यापासून खत निर्मितीची योजना यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने मुंबईतील ६१ मंडयांमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मंडयांत दररोज गोळा  होणाऱ्या ४२ मेट्रीक टन कचऱ्याची तेथेच विल्हेवाट लागेल, असा पालिकेचा दावा आहे.

मुंबईकरांचा कचरा सामावून घेणाऱ्या देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीतील कचरा साठवणुकीची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे दर दिवशी मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणारा कचरा पालिकेसाठी डोकेदुखी बनला आहे. यावर तोडगा म्हणून मुंबईतील २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या, तसेच दर दिवशी १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या सोसायटय़ांना कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे बंधन पालिकेने घातले आहे. सोसायटय़ा, मॉल्स आणि हॉटेल्सवर बंधन घालणाऱ्या पालिकेने आपल्या मंडयांमध्येही हरित कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी योजना आखली होती. मात्र कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी या योजनेला मूर्त स्वरूप देण्यात पालिका अपयशी ठरत होती. बरेच प्रयत्न केल्यानंतर दादरमधील क्रांतिसिह नाना पाटील मंडई आणि माँसाहेब फूलबाजारासह चार मंडयांमध्ये हरित कचऱ्यापासून खतनिर्मितीचा श्रीगणेशा करण्यात पालिकेला यश आले. आता पालिकेने तब्बल ६१ मंडयांमधील हरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ६५ मंडयांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या ४२ मेट्रिक टन कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईमध्ये पालिकेच्या एकूण ९१ मंडया असून तेथे निर्माण होणारा कचरा कचराभूमींमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यापैकी चार मंडयांमध्ये यापूर्वीच खतनिर्मिती करण्यात येत असून ६१ मंडयांमध्ये लवकरच ती सुरू होणार आहे. त्यामुळे कचराभूमीवरील कचऱ्याचा भार हलका होऊ शकेल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

मंडयांमधील हरित कचऱ्याची तेथेच विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यासाठी ६१ मंडयांची निवड करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करुन  लवकरच ही योजना राबविण्यात येईल.

– प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त, बाजार विभाग