बोरिवली, विक्रोळी येथील बालवाडी, शौचालय, कूपनलिका आदी कामांची खोटी छायाचित्रे लावून ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी अभियंते व ठेकेदारांशी संगनमत करून गोरेगावकरांच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४० लाखांच्या खासदार निधीवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘खासदार निधी खर्च तर होतो, पण कामे दिसत नाहीत’, या सर्वसामान्यांच्या तक्रारीचे नेमके कारण यानिमित्ताने समोर आले आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’चे तत्कालीन राज्यसभा खासदार वाय. पी. त्रिवेदी यांनी २०११-१२ मध्ये ४० लाख रुपयांचा निधी गोरेगावातील विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गोरेगावातील विकासकामांची यादी त्यासाठी केली होती. यात शौचालय, बालवाडी, लादीकरण, लोखंडी बाक, कूपनलिका अशा कामांचा समावेश होता. खासदार निधी जिल्हा नियोजन कार्यालयामार्फत उपलब्ध होतो. तिथल्या समितीने या कामांना मान्यता देत प्रत्यक्ष बांधकामासाठी म्हणून ‘म्हाडा’कडे वर्ग केली. ‘म्हाडा’च्या ‘अतिक्रमण निष्कासन कक्षा’तर्फे (ईआरसी) ही कामे करण्यात आली. सुरुवातीला काही मान्यतांअभावी ही कामे रखडली होती. कालांतराने पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी संबंधित कामाची माहिती नियोजन कार्यालयाकडून घेतली तेव्हा त्यांना धक्काच बसला. शौचालय, बालवाडी, लादीकरण, लोखंडी बाक आदी कामे केल्याचा खोटाच अहवाल ‘म्हाडा’ मंडळाने कार्यालयाकडे सादर केला होता. कारण, तब्बल ४० लाख रुपये खर्च करून गोरेगावमध्ये कामे झाल्याचा दावा म्हाडाच्या ‘ईआरसी’चे कार्यकारी आणि उप अभियंता आपल्या सहीनिशी देत होते. पण मुळातच ही कामे गोरेगावमध्ये झालेली नव्हती.
मग त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली अहवाल मागितला. त्यात छायाचित्रण आणि ‘फोटोशॉप’च्या करामती करून दुसरीकडची कामे गोरेगावातील म्हणून दाखवण्यात आली होती. बोरिवली, विक्रोळी येथील कामांची वेगवेगळ्या कोनांमधून  छायाचित्रे काढून, काही ठिकाणी त्यावर फोटोशॉपच्या मदतीने खोटय़ा पाटय़ा ‘डकवून’ (एम्बॉस) संबंधित कामे गोरेगावात झाल्याचे भासविण्यात आले होते. परंतु, गोरेगावमधील शौचालयाच्या कोनशीला पाटीवर विक्रोळीचे आमदार संजय दिना पाटील नाव कशाकरिता़? किंवा बोरिवलीचे पक्षाचे तत्कालीन नेते प्रकाश सुर्वे गोरेगावच्या लादीकरणाच्या पाटीवर कसे बुवा झळकणार, असा प्रश्न हा नियोजन कार्यालयाला नसला तरी आम्हाला पडतो, असा खोचक प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा काणाडोळा!
मुळात २००९ मध्ये मुंबईत विधानसभा निवडणुकीत पक्षाचा ठिकठिकाणी पराभव झाला. त्यामुळे काही विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी खासदार निधीतून विकासकामांचा धडाका लावण्यात यावा, असा निर्णय झाला. पक्षाध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईकडे लक्ष देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यातून ही कामे करण्यात आली होती. मात्र त्यातच गैरप्रकार झाला. पक्षाच्या योजनेचा बोऱ्या वाजला. चव्हाण यांनी या गैरप्रकाराची तपशीलवार माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे केली. पण त्याकडे काणाडोळा करण्यात आला, असे चव्हाण यांनी सांगितले.

बोरिवली – हे मूळचे बोरिवलीतील शौचालय गोरेगावमध्ये दाखविण्यात आले आहे. प्रकाश सुर्वे उद्घाटक म्हणून दाखविणारी शौचालयावरची पाटीही नंतर ‘एम्बॉस’ केलेली दिसते.

* खासदार निधीतील कामे प्रत्यक्ष जाऊन, त्या कामाचा दर्जा तपासून अहवाल देण्याची जबाबदारी ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांची आहे.
* गोरेगावमध्ये या पैशातून  काहीच काम झालेले नसताना कार्यपूर्तीचा
अहवाल ‘म्हाडा’च्या अभियंत्यांनी दिला कसा?
* या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.  ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी किती मलिदा लाटला याची चौकशी करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. परंतु, या कामांमध्ये गैरव्यवहार झाले असतील, तर आम्ही त्याची निश्चितपणे चौकशी करू.
– संभाजी झेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

 रेश्मा शिवडेकर, मुंबई</strong>