सलमान खानविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खटल्यातील एकूण ६३ साक्षीदारांपैकी अवघ्या सात साक्षीदारांच्या जबाबाच्या मूळ प्रती उपलब्ध असून अन्य गहाळ असल्याचा आणखी एक खुलासा शुक्रवारी सलमानच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला. तसेच सत्यप्रतीच्या आधारे खटल्याचे कामकाज पुढे सुरू ठेवण्यास आपला विरोध असल्याचेही सलमानच्या वतीने सांगण्यात आले.
मागील सुनावणीच्या वेळीही दोन साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती सापडत नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्या साक्षीदारांचे जबाब न नोंदवताच न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी महिन्याभरासाठी तहकूब केली होती. शुक्रवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली असता एकूण ६३ साक्षीदारांपैकी केवळ सात साक्षीदारांच्या जबाबाच्या मूळ प्रती उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या प्राथमिक चौकशी अहवालाची न्यायालयाकडे पाठविण्यात आलेली प्रत, तीन जबाबांच्या प्रती आणि पंचनाम्याच्या प्रती अशी नेमकीच मूळ कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयाला सांगितले. उर्वरित पुरावे सत्यप्रत म्हणून उपलब्ध आहेत. मात्र मूळप्रत आणि सत्यप्रत यामध्ये फरक आहे आणि खटल्याच्या कामकाजाच्या वेळेस सरकारी पक्षाकडील मूळ प्रतीतील मजकूर आणि आम्हाला उलपब्ध करून दिलेल्या सत्यप्रतीतील मजकूर पडताळून पाहणे आवश्यक असते. पुराव्यांच्या मूळ प्रती गहाळ असणे ही गंभीर बाब असून आरोपीच्या विरोधात जाणारी आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न सलमानकडून झाला. त्यावर गहाळ प्रती शोधणे सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितल़े त्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी २१ ऑगस्टला ठेवली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2014 रोजी प्रकाशित
सलमान खान खटल्यातील बहुतांश कागदपत्रे गहाळ
सलमान खानविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खटल्यातील एकूण ६३ साक्षीदारांपैकी अवघ्या सात साक्षीदारांच्या जबाबाच्या मूळ प्रती उपलब्ध असून अन्य गहाळ असल्याचा आणखी एक खुलासा शुक्रवारी सलमानच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला.

First published on: 26-07-2014 at 05:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most of document in salman khan case missing