सरकारचा सावध पवित्रा; आज सुनावणी

मुंबई: र्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा सावध पवित्रा कायम आहे. त्यामुळे सामान्य प्रवासी अद्यापही रेल्वेच्या प्रतीक्षायादीतच आहेत.

सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत बुधवारी उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी भूमिका स्पष्ट के ली जाईल, असे महाधिवक्त्यांनी गेल्या आठवडय़ात सांगितले असले तरी लगेचच रेल्वे सुरू करण्याबाबत सरकार पातळीवर विचार नसल्याचे समजते.

सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सार्वजनिक हित याचिकेवर सुनावणीच्या वेळी राज्य सरकारच्या वतीने कोणती भूमिका मांडली जाते याकडे लाखो उपनगरीय रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवडय़ातील सुनावणीत बुधवारी भूमिका मांडू, असे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट के ले होते. राज्य सरकारच्या भूमिके बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा के ली.

राज्यात व विशेषत: मुंबईत करोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली असली तरी सामान्यांसाठी लगेचच रेल्वे सेवा सुरू करणे धोक्याचे ठरेल, असाच सरकारमध्ये मतप्रवाह आहे. १६ तारखेपासून लसीकरणाची मोहिम सुरू होत आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरणाला वेग येईल. रेल्वे सेवा सुरू करण्याची घाई के ल्यास त्याचे दुष्पपरिणाम होऊ शकतात. यामुळेच रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय महिनाअखेर घेतला जाईल, असे सांगण्यात आले. लवकरच रेल्वे सेवा सुरू एवढेच न्यायालयात सांगण्यात येईल.