आरेचा परिसर राखीव वन जमीन म्हणून अधिसूचित करण्याच्या निर्णयावर अंमलबजावणी सुरू झाली असून आरेतील एकूण ३२८ हेक्टर जमीन राखीव वन म्हणून जाहीर करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहतीच्या (दुग्धव्यवसाय विकास विभाग) ताब्यातील २८८.४३ हेक्टर आणि वन विभागाच्या ताब्यातील ४०.४६ हेक्टर जमीन अशी एकूण ३२८.९० हेक्टर जमीन भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४ अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी जाहीर केले. यानंतर हरकती व सूचना मागवून व त्यावर सुनावणी झाल्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २० ची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल असेही वनमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक अधिसूचनेनुसार वन जमाबंदी अधिकारी कोकण हे या जमिनीवरील हक्क, स्वरूप, व्याप्ती याबाबत चौकशी करतील तर त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्याकडे अपिल करता येईल, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली.