‘येणार, येणार’, म्हणून गेले दीड वर्ष मुंबईकरांना हुलकावणी देणाऱ्या नव्या बंबार्डिअर गाडय़ांपैकी दोन गाडय़ा मंगळवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या गाडय़ा पश्चिम रेल्वेवर चालण्यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी आवश्यक होती. सोमवारी संध्याकाळी रेल्वे बोर्डाचे याबाबतचे पत्र आले आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मंगळवारी संध्याकाळपासून ही गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. सध्या ही गाडी ताशी ७० ते ८० किमी या वेगानेच धावणार आहे. पुढील तीन महिने या गाडीबाबत प्रवाशांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार असून त्यानंतर याबाबतचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार आहे. दरम्यान पुढील दीड वर्षांत उर्वरित ७० गाडय़ा टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम तसेच मध्य रेल्वेवर जुन्या गाडय़ा, डीसी-एसी गाडय़ा आदी विविध गाडय़ा चालत आहेत. मात्र या गाडय़ांपैकी काहींचे आयुर्मान ओलांडले आहे, तर काही गाडय़ा अचानक बिघाड होऊन बंद पडतात. अशा वेळी मुंबईकरांच्या हमखास हवेशीर आणि आरामदायक प्रवासाची ग्वाही देणाऱ्या या ७२ नव्या गाडय़ा कधी येणार, याची उत्कंठा लागून होती. या गाडय़ांपैकी दोन गाडय़ा नोव्हेंबर २०१३मध्येच मुंबईत आल्या होत्या. पूर्णपणे एसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या या गाडय़ांची चाचणी गेले दीड वर्ष पश्चिम रेल्वेवर चालू होती. या गाडय़ा मुंबईत चालण्यासाठी काही नियमांमधून सवलतही आवश्यक होती. ही सवलतही मिळाली होती. मात्र रेल्वे बोर्डाचे प्रमाणपत्र मिळणे बाकी होते. सोमवारी संध्याकाळी हे प्रमाणपत्र पश्चिम रेल्वेकडे पोहोचले. त्यानुसार पश्चिम रेल्वेचे हंगामी महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी या दोन गाडय़ा मंगळवारी संध्याकाळपासून पश्चिम रेल्वेवर चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन गाडय़ा ताफ्यात आल्यानंतर ऑगस्ट २०१५पासून चार-चारच्या ताफ्यात पुढील ७० गाडय़ा डिसेंबर २०१६पर्यंत दाखल होतील, असे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले.
प्रवाशांना फायदा काय?
सध्या या गाडय़ांना चर्चगेट ते बोरिवली (धीमा मार्ग) या दरम्यान ताशी ७० किमी आणि जलद मार्गावर ताशी ८० किमी एवढी वेगमर्यादा घालण्यात आली आहे. बोरिवलीच्या पलिकडे डहाणूपर्यंत ही मर्यादा ताशी ८० किमी एवढी आहे. त्यामुळे सध्या वेळेच्या बचतीसाठी नव्या गाडय़ांचा काहीच फायदा होणार नाही. पण ही गाडी ताशी १०० ते ११० किमीपर्यंत वेगाने धावू शकते. त्यासाठी पुढील दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. मात्र या गाडय़ा आरामदायक असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखावह होणार आहे. तीन महिने प्रवाशांच्या सूचना स्वीकारल्या जाणार असून त्यातील व्यवहार्य सूचनांप्रमाणे पुढील गाडय़ांमध्ये बदल करण्यात येतील.