मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, राज्यामध्ये शुक्रवारी ११४ नवे रुग्ण सापडले. यामुळे रुग्णांची संख्या १ हजार २७६ वर पोहोचली. तर मुंबईतील रुग्णांची संख्या ६१२ इतकी झाली आहे. तसेच राज्यामध्ये शुक्रवारी करोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे.
राज्यामध्ये शुक्रवारी ११४ रुग्ण सापडले. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४२, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील ३७, मीरा भाईंदर महानगरपालिका व पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येकी ७, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील ६, नवी मुंबई महानगरपालिकच्या हद्दीतील ४, कल्याण महानगरपालिकेच्या हद्दीतील ३, पुणे जिल्ल्यात २, ठाणे महानगरपालिका, काेल्हापूर महानगरपालिका, सांगली महानगरपालिका, परभणी महानगरपालिका आणि सातारा, छत्रपती संभाजी नगरच्या हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे आहे.
राज्यामध्ये शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्या रुग्णाला उच्च रक्तदाब व मधुमेह अशा सहव्याधी होत्या. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या १८ वर पोहचली आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण १५ हजार ५१० करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ हजार २७६ जण बाधित आढळले. आतापर्यंत ६८१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, ५७७ रुग्ण सक्रिय आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.