लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला हल्लेखोर मॉरिस नरोन्हा याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याने शनिवारी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्याच्या या अर्जाला घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी हस्तक्षेप अर्जाद्वारे विरोध केला आहे. न्यायालयाने सगळ्या पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर मिश्रा याच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केले.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी फेसबुक लाईव्हदरम्यान मॉरिसने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर, त्याने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून मॉरिसचा अंगरक्षक मिश्रा याला पोलिसांनी अटक केली होती. आपल्याला मॉरिसने एक लॉकर दिला होता. त्यात, त्याने पिस्तूल ठेवले होते व लॉकरची चावीही स्वत:कडेच ठेवली होती. घटना घडली त्यावेळी आपण तेथे नव्हता. त्यामुळे, आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी मिश्रा याने जामिनाची मागणी करताना केला.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलिसांकडून मुख्य आरोपीला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिश्रा आणि मॉरिस यांनी डिसेंबर २०२३ मध्ये १५ काडतुसे खरेदी केली होती. तसेच, मिश्राला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो संशयितरित्या मॉरिस याच्याकडे नोकरीला लागला होता. घटनेच्या वेळी मिश्रा तिथेच उपस्थित होता. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात तो दिसत आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून गुन्ह्यात मिश्रा याचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, असा दावा तेजस्विनी घोसाळकर यांच्यातर्फे न्यायालयात करण्यात आला. तसेच, मिश्राचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी त्यांनी केली. दुसरीकडे, मिश्राला पिस्तूल स्वतःकडे ठेवण्याची परवानगी होती ही माहिती त्याने पोलिसांपासून लपवली. त्याने स्वत:चे पिस्तूल मॉरिसकडे ठेवण्यात कसे दिले, असा प्रश्न करून त्याचीही चौकशी करायची असल्याचे पोलिसांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, मिश्रा याला जामीन देण्यास विरोध केला.