मुंबई : गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात उन्हाळी पावसाचा जोर राहणार आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातवर मोठ्या प्रमाणावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, तर छत्तीसगडवर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.या दोन्ही वाऱ्याच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उन्हाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर ३४ ते ३५, मध्य महाराष्ट्रात ३७ ते ४२, मराठवाड्यात ४१ ते ४२ आणि विदर्भात ४२ ते ४४ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. बाष्पयुक्त वारे असताना तापमान वाढीमुळे उकाडा वाढतो. बाष्पीभवन होऊन उंच ढगांची निर्मिती होते. या उंचावरील ढगांमध्ये बाष्प मिसळल्यामुळे दुपारनंतर विजाच्या कडकडाटासह गारपीट होते, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सानप यांनी दिली.

गारपिटीचा अंदाज कुठे, कधी ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये सोमवार ते बुधवार. नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवार ते गुरुवार. विदर्भ आणि मराठवाड्यात बुधवार आणि गुरुवारी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. छत्तीसगडवर घड्याळ काटा दिशेच्या विरुद्ध फिरणाऱ्या आवर्ती व अरबी समुद्रात दीड किमी. उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती अशा दोन्हीही चक्रीय वाऱ्यांच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता जाणवते, असेही खुळे यांनी म्हटले आहे.