मुंबई : नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर स्वतंत्रपणे बैठक झाली नाही.

गृहमंत्री अमित शहा यांनी आयोजित के लेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या ममता बँनर्जी, छत्तीसगडचे भूपेश बगेल, के रळचे पिनरायी विजयन  अनुपस्थित होते. भाजपविरोधी किं वा भाजपचा मित्र पक्ष नसलेल्या राज्यांपैकी उद्धव ठाकरे व झारखंडचे हेमंत सोरेन हे दोन मुख्यमंत्री उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा अधिकृत भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांच्यात स्वंतत्रपणे सुमारे पाऊण तास भेट झाली होती. या भेटीनंतर राज्यातील राजकीय संदर्भ बदलणार अशा वावडय़ा उठल्या होत्या. या पार्श्वभूमीवर  अमित शहा यांच्याबरोबर ठाकरे यांची स्वतंत्रपणे भेट होईल अशी अटकळ बांधली जात होती. गृहमंत्रालयाने आयोजित केलेल्या बैठकीला ठाकरे हे पूर्णवेळ उपस्थित होते. बैठकीनंतर अमित शहा यांच्याबरोबर अन्य मुख्यमंत्र्यांसमवेत ठाकरे यांनी भोजन के ले. यानंतर ठाकरे हे विज्ञान भवनाच्या बाहेर पडले व त्यांनी थेट विमानतळ गाठले. अमित शहा आणि ठाकरे यांच्या भेटीची अटकळ बांधली जात असतानाच, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी स्थानिक पातळीवर आमचे ऐका, असा राष्ट्रवादीला सल्ला देत अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीत एव्हाना गेलेच आहेत, असे मिश्किल वक्तव्य के ल्याने चर्चा सुरू झाली होती.