विशेष न्यायालयाने ‘ईडी’ची मागणी फेटाळली

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे म्हणावी तशी चौकशी करता आली नाही आणि त्यांनीही उत्तरे देण्यास टाळाटाळ के ली असा दावा करीत त्यांना आणखी नऊ दिवसांच्या कोठडीची अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) मागणी विशेष न्यायालयाने शनिवारी फेटाळली. तसेच देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

कोठडीची मुदत संपल्याने देशमुख यांना विशेष सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तपासासंबंधी आवश्यक कागदपत्रे मिळवता आली नाहीत. शिवाय त्यांची आणि प्रकरणातील अन्य आरोपींची समोरासमोर चौकशी करता आली नाही, असे ‘ईडी’च्या वतीने अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी देशमुख यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना न्यायालयाला सांगितले. तर कोठडी वाढवून मागताना ‘ईडी’तर्फे कोणतेही नवीन आणि ठोस कारण देण्यात आलेले नाही. देशमुख गेल्या पाच दिवसांपासून ‘ईडी’च्या कोठडीत आहेत. या पाच दिवसांत त्यांना २५०हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. विशेष कारण असल्यासच २४ तासांहून अधिक काळासाठी कोठडी देण्यास परवानगी आहे. परंतु ‘ईडी’तर्फे असे कोणतेही विशेष कारण देण्यात आले नसल्याकडेही देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच ‘ईडी’च्या कोठडीच्या मागणीला विरोध केला.

ईडीचा दावा

गृहमंत्री असताना डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यामार्फत बार मालकांकडून देशमुख यांना ४.७ कोटी रुपयांची खंडणीची रोख रक्कम मिळाली होती. ही रक्कम देशमुख यांचा मुलगा हृषिकेश याने दिल्लीस्थित एका कंपनीला दिली. त्यानंतर ती श्री साई शिक्षण संस्था ट्रस्टकडे देणगीच्या स्वरूपात वळवण्यात आली. या प्रकरणात वाझे यांचा मुख्य हात आहे. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवण्याच्या मागणीसाठी विशेष राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयात अर्ज करण्यात आल्याचा दावाही ‘ईडी’ने केला.

देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रण असलेल्या २७ कंपन्यांचा वापर त्यांच्या अवैधरित्या कमावलेल्या पैशांसाठी करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याचा दावा ‘ईडी’ने केला. त्यांची मुले हृषीकेश, सलील आणि कुटुंबातील अन्य सदस्यांच्या वैयक्तिक बँक खात्यांतून या कंपन्यांकडे हे पैसे वळवण्यात आले. देशमुख यांनीही काही कंपन्यांशी स्वत: व्यवहार केले होते. मात्र त्याबाबतची उत्तरे देण्यास देशमुखांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे.

२५०हून अधिक प्रश्न…

कोठडी वाढवून मागताना ‘ईडी’ने नवे आणि ठोस कारण दिलेले नाही. देशमुख पाच दिवसांपासून ‘ईडी’च्या कोठडीत असून या काळात त्यांना २५०हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. विशेष कारण असल्यासच २४ तासांहून अधिक काळ  कोठडी देण्यास परवानगी आहे. परंतु ‘ईडी’तर्फे असे कोणतेही विशेष कारण दिले नसल्याचा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला. तो न्यायालयाने मान्य केला.

मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशमुखांचा मुलगा हृषीकेश याला ‘ईडी’ने समन्स बजावल्यानंतर त्यानेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र ‘ईडी’ला त्याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यास वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करून न्यायालयाने अर्जावरील सुनावणी १२ नोव्हेंबरला ठेवली आहे.