लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) रविवारी, १६ फेब्रुवारीला मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग १३ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

अटल सेतू जानेवारी २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येत आहे. मात्र यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पथकर मोजावा लागतो. असे असले तरी अतिजलद प्रवास करण्यासाठी वाहनचालक-प्रवासी अटल सेतूचा पर्याय निवडतात. असा हा अटल सेतू शनिवारी रात्री ११ वाजता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अटल सेतूवरील वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएमआरडीएकडून रविवारी पहाटे ४ ते दुपारी १२ या वेळेत मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतूवरील वाहतूक सलग १३ तास बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना इतर पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. अटल सेतूवरील ही मॅरेथॉन रविवारी पहाटे ४ ते १२ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे मॅरेथॉन शर्यत संपल्यानंतर रविवारी दुपारी १ वाजल्यापासून अटल सेतूवरील वाहतूक सुरळीत होणार आहे.