मुंबई : करोना महामारीनंतर जगभरातील आरोग्यदृष्टीकोनात आमूलाग्र बदल दिसून येत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, नैसर्गिक औषधोपचार आणि संपूर्ण जीवनशैलीकडे लोकांचा कल वाढला असून त्यातून भारतीय आयुर्वेदशास्त्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेच्या माहितीनुसार, पारंपरिक आणि नैसर्गिक उपचार पद्धतींचा अभ्यास व प्रसार करण्यासाठी विविध देशांत संशोधनाला चालना दिली जात आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने या काळात केलेल्या संशोधनातून सिद्ध झालेले औषधी वनस्पती, काढे, तसेच योग–प्राणायामासारख्या पद्धतींना विदेशातही मान्यता मिळू लागली आहे.

विशेष म्हणजे अमेरिका, युरोप, मध्यपूर्व आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांनी आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची निर्यात वाढविण्यासाठी भारताशी करार केले आहेत. हळद, अश्वगंधा, गुळवेल, त्रिफळा, तुळस अशा वनस्पतींच्या उत्पादनाला विक्रमी मागणी येत असून जागतिक हर्बल बाजारपेठेत भारताचे वर्चस्व वाढत आहे.

तज्ज्ञांच्या मते, करोनामुळे आलेल्या मानसिक ताण, निद्रानाश, स्थूलता व मधुमेहासारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर आयुर्वेदातील औषधे आणि उपचारपद्धती प्रभावी ठरत असल्याचे अनुभवजन्य पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे केवळ औषधोपचार नव्हे, तर आहारशास्त्र, दिनचर्या आणि योगावर आधारित ‘होलिस्टिक हेल्थकेअर’ हा नवा ट्रेंड जगभर बळकट होत आहे.

भारताने गोरगरिबांपासून ते शहरी वर्गापर्यंत आरोग्य पोहोचविण्यात आयुर्वेदाला दिलेला प्राधान्यक्रम आता जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी आदर्श ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. करोनापश्चात जग एका सुरक्षित, नैसर्गिक आणि दीर्घकालीन आरोग्य उपायांच्या शोधात आहे, आणि त्यात आयुर्वेद हे एक विश्वासार्ह उत्तर म्हणून उदयास आले आहे.

जगभर आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसोबतच पारंपरिक औषधपद्धतींविषयी नव्याने रस निर्माण होत आहे. त्यात भारताची परंपरा असलेली आयुर्वेद चिकित्सा जागतिक स्तरावर नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट पुणे येथील इंटिग्रेटड कॅन्सर रिसर्च सेंटरचे विश्वस्त डॉ सुकुमार सरदेशमुख यांनी सांगितले.

आज आमच्या पुण्यातील केंद्रात जपान, जर्मनी, अमेरिका तसेच रशियामधून रुग्ण उपचारांसाठी येतात असेही त्यांनी सांगितले. आयुर्वेद हे शाश्वत भारतीय शास्त्र असून त्याला अधिक संशोधन व पुराव्यांची जोड दिली तर भारतीय आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मान्यता मिळेल असेही डॉ सुकुमार यांनी सांगितले.

आगामी काळात कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य यांसारख्या असंसर्गजन्य आजारांच्या व्यवस्थापनात आयुर्वेद निश्चितपणे महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र, त्यासाठी सखोल संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार गुणवत्ता नियंत्रण आवश्यक असल्याचेही डॉ सुकुमार सरदेशमुख म्हणाले.भविष्यातील आरोग्य व्यवस्थेत ‘इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’ म्हणजेच आयुर्वेद व आधुनिक विज्ञान यांचा निश्चितपणे संगम होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांत जगभर वेलनेस, प्रिव्हेन्शन आणि नॅचरल हीलिंग यांना वाढती मागणी आहे. आयुर्वेदिक औषधे, पंचकर्म, आहारशास्त्र व जीवनशैलीवर आधारित उपाययोजना आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ठरत असल्याचे दिसून आले आहे. आयुष मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या दशकात आयुर्वेदिक औषधांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने २०२२ मध्ये गुजरातमध्ये ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन स्थापन केल्यानंतर आयुर्वेदाला जागतिक पातळीवर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे संशोधन, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आधुनिक वैद्यकीय प्रणालींसोबत एकत्रित वापर याला गती मिळत आहे.