चोखंदळ साहित्यप्रेमी आणि वाचकांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि ग्रंथप्रसार व ग्रंथलेखनाला वाहिलेल्या ‘ललित’ या मासिकाचा जून महिन्याचा अंक नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अंक ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे विशेषांक म्हणून काढण्यात आला आहे.
‘सबकुछ’ नेमाडे असे या अंकाचे वर्णन करता येईल. या अंकात भालचंद्र नेमाडे यांच्या परिचयासह मराठी कादंबरीच्या क्षेत्रातील भालचंद्र नेमाडे यांची कामगिरी, भालचंद्र नेमाडे यांची नैतिकतेची संकल्पना, हिंदू-एक स्त्री विश्वरूपदर्शन, भालचंद्र नेमाडे यांची कविता, हिंदू-एक आत्मप्रत्यय, भालचंद्र नेमाडे यांचे समीक्षालेखन, नेमाडे यांच्या कादंबऱ्यांमधील सामाजिकता, नेमाडे यांचे भाषांतरविषयक विचार, नेमाडे, संत आणि संतप्रणित मूल्ये, नेमाडे यांच्या कादंबऱ्यांतील निवेदक, नेमाडे यांच्या लोकप्रियतेचे रहस्य आणि अन्य काही विषयांवर विविध मान्यवर लेखक व समीक्षकांचे लेख आहेत. यात अविनाश सप्रे, वसंत आबाजी डहाके, वसंत पाटणकर, विलास खोले, हरिश्चंद्र थोरात, अभय टिळक आणि अन्य लेखकांचा समावेश आहे.
‘ललित’ मासिकाच्या जानेवारी १९६४च्या अंकात ‘स्वागत’ या सदरातील नेमाडे यांनी आपला स्वत:चा परिचय करून दिलेला लेख या विशेषांकात पुन्हा प्रकाशित करण्यात आला आहे. नव्याने लेखन करू लागलेल्या लेखकांचा परिचय या सदरातून स्वत: लेखकच करून देत असे. याची सुरुवात नेमाडे व पुरुषोत्तम धाक्रस या तेव्हा नवोदित असलेल्या लेखकांनी करून दिली होती.
१९८ पृष्ठसंख्या असलेल्या या विशेषांकाची किंमत शंभर रुपये इतकी आहे. नेमाडे यांचे चाहते, मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी हा अंक संग्राह्य़ आहे.