मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या चार जागांवरून महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेचा आमदार असल्याने या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला असतानाच भाजपने सोमवारी उमेदवारी जाहीर केली. यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाने कोकण पदवीधरमध्ये भाजपच्या विरोधात लढण्याचा इशारा दिला. तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिंदे गट विद्यामान आमदाराला उमेदवारी देणार असतानाच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भावाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. विधान परिषदेच्या चारपैकी तीन जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केले. कोकण पदवीधरमध्ये विद्यामान आमदार निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यातील मुंबई पदवीधर मतदारसंघ गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र भाजपने ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांची उमेदवारी जाहीर केली. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाने लगेचच भाजपचे निरंजन डावखरे उमेदवार असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याचा इशारा दिला. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात घेतल्याची माहिती पसरविण्यात आली. मुंबईची जागा लढविण्यास भाजप ठाम असल्यास कोकण पदवीधर मतदारंसघात शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई पदवीधवरवरून भाजप आणि शिंदे गटाकडून शह-काटशहा देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हेही वाचा >>> लोकसभा निवडणूक होताच महायुतीत फूट? भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-शिवसेना विधानपरिषदेसाठी आमनेसामने मुंबई पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाकडून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचा आमदार असला तरी महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने उमेदवार उभा केला आहे. मनसेने उमेदवार उभा केला असतानाच शिंदे गटाने संजय मोरे यांना उमेदवारी उर्ज दाखल केल्यास भाजपचे निरंजन डावखरे यांच्यासमोर आव्हान उभे राहू शकते. नाशिक शिक्षक मतदारसंघातून विद्यामान आमदार किशोर दराडे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघातही महायुतीत सहमती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पदवीधरसाठी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आणि शिक्षक मतदारसंघासाठी ज. मो. अभ्यंकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शेकापचे आमदार जयंत पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, सपाचे आमदार रईस शेख आदी उपस्थित होते. भाजपमध्येही नाराजीनाट्य मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपने शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने इच्छूक अनिल बोरनारे नाराज झाले आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. २५ वर्षांत आपल्याला तीन वेळा उमेदवारी नाकारण्यात आली. २०१८ मध्ये जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी मागे घेण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे आता अपक्ष लढावे म्हणून यासाठी आपल्यावर समर्थकांचा दबाव असून मंगळवारी संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.