मुंबई महापालिकेने तयार केलेल्या २०१४ – ३४ च्या प्रस्तावित विकास आराखडय़ात पर्यावरण, इ- कचरा, डेब्रिज, वाढती झोपडपट्टी, सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे पाणी साठून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्येचा गांभीर्याने विचारच केलेला दिसत नाही. एकीकडे अशा अनास्थेमुळे आरोग्याच्या समस्या तीव्र होत असताना, आरोग्य सुविधांची वाढती गरजही गांभीर्याने लक्षात घेतलेली दिसत नाही. मुंबईतील विविध पालिका रुग्णालयांमध्ये सुमारे १४ अतिरिक्त खाटांची व्यवस्था करावी लागणार आह़े तर ६४,१५७ सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधावी लागणार आहेत. हे काम कधी करणार, हा कळीचा प्रश्न आहे.
मुंबई शहरासाठी पहिली विकास योजना १९६४ साली तयार करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत तयार झालेल्या विकास योजना आराखडय़ांची प्रत्यक्षात केवळ बारा टक्केच अंमलबजावणी झाली असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोग्याचा र्सवकष विचार करायचा झाल्यास मलनिस्सारण वाहिन्या व जुन्या जलवाहिन्यांच्या गुंत्यामुळे आरोग्याचे निर्माण होणारे प्रश्न, घनकचरा व वाहतुकीमुळे निर्माण होणारे पर्यावरणाच्या समस्यांचा विचार होणे गरजेचे आहे. लक्षावधी महिला नोकरीसाठी मुंबईत ये- जा करतात. अशा महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या तुटपुंजी असल्यामुळे महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. संपूर्ण मुंबईत आज दहा हजार लोकांमागे एक या प्रमाणे जेमतेम तेरा हजार स्वच्छतागृहे मुंबईत आहेत. मुंबईची ६४,१५७ स्वच्छतागृहांची गरज नव्वदच्या दशकात निश्चित करण्यात आली होती. पंचवीस वर्षांनंतरही ज्यांना स्वच्छतागृहेही वेळेत बांधता आली नाहीत, ते विकास आराखडय़ाची अंमलबजावणी कशी करणार, असा सवाल ‘युडीआर आय’च्या सदस्यांनी केला आहे.
मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ४५,९०७ खाटा आहेत. विद्यमान लोकसंख्येचा विचार करता रुग्णालयांची संख्या पुरेशी असली तरी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता १४ हजार अतिरिक्त खाटा असणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या प्रस्तावित विकास आराखडय़ात म्हटले आहे. सध्या पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ११,६८० खाटा आहेत. प्रामुख्याने उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि पालिकेचा कुर्मगती कारभार विचारात घेता चौदा हजार रुग्णालयीन खाटा आणि ६७ हजार टॉयलेटस् गरज आहे.