हिमालय पुलाची पुनर्बाधणी लवकरच

सहा कोटी ३८ लाखांचा अंदाजित खर्च, निविदा मागवल्या 

गेल्या वर्षी १४ मार्च २०१९ रोजी  हिमालय पुलाचा भाग भर रस्त्यात कोसळला.

सहा कोटी ३८ लाखांचा अंदाजित खर्च, निविदा मागवल्या 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरी रेल्वे स्थानकालगतचा हिमालय पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला पावणे दोन वर्षे पूर्ण होत आल्यानंतर अखेर या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पूल विभागाने निविदा मागवल्या आहेत. पूर्वीचा पूल गंजल्याचे सर्वेक्षणात आढळले होते. त्यामुळे या पुलासाठी स्टीलची तुळई (गर्डर) टाकण्यात येणार आहे. या पुलासाठी ६ कोटी ३८ लाखाचा खर्च अंदाजित आहे.

गेल्या वर्षी १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी गर्दीच्या वेळी हिमालय पुलाचा भाग भर रस्त्यात कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचे बळी गेले तर ३० जण जखमी झाले. या पुलाच्या दुर्घटनेमुळे पालिकेवर प्रचंड टीका झाली तसेच रेल्वे प्राधिकरणावरही आरोप झाले. या दुर्घटनेनंतर पूल विभागातील तीन अभियंत्यांना अटक करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबईतील सर्वच पुलांचे नंतर सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र हिमालय पुलाची पुनर्बांधणी कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

हिमालय पुलावरून रोज हजारो प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे लोकल पकडण्यासाठी जात असत. डी. एन. मार्गावर असलेला हिमालय पूल पडल्यानंतर पादचारी रस्ता ओलांडून जात होते. वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर पादचारी पूल बांधण्याची गरज होती. त्यामुळे पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

या पुलासाठी स्टीलचा गर्डर बसवण्यात येणार आहे. पुलाचे काम पावसाळा धरून सव्वा वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. काम करत असताना वाहनांच्या वर्दळीचे नियोजन वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाने करण्यात येणार असून पादचाऱ्यांसाठी मात्र हा रस्ता बंद करता येणार नाही, असे निविदेच्या अटी शर्तीमध्ये म्हटले आहे.

दक्षिण मुंबईत खाऱ्या हवेमुळे धातू गंजण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या पुलाच्या अधिक मजबुतीसाठी स्टीलचे गर्डर वापरण्यात येणार आहेत. या पुलाला नेहमीप्रमाणे पायऱ्या असतील. हिमालय पुलाचे वेल्डिंग निघाल्यामुळे सहा बाय आठ फु टांचा भाग पडला होता. त्यामुळे आम्ही स्टीलचे प्लेट गर्डर लावणार आहोत, अशी माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दुर्घटनेच्या कटू स्मृती

गेल्या वर्षी १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी गर्दीच्या वेळी हिमालय पुलाचा भाग भर रस्त्यात कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचे बळी गेले तर ३० जण जखमी झाले. या पुलाच्या दुर्घटनेमुळे पालिकेवर प्रचंड टीका झाली तसेच रेल्वे प्राधिकरणावरही आरोप झाले होते .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bmc will issue tender notices for the reconstruction of the himalaya bridge zws