मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल गुरुवार, ११ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. सीए अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल २७.३५ टक्के, दुसऱ्या ग्रुपचा निकाल ३६.३५ टक्के लागला. तर दोन्ही ग्रुप मिळून १९.८८ टक्के निकाल लागला आहे. तर, इंटरमिजिएट परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल २७.१५ टक्के, तर दुसऱ्या ग्रुपचा निकाल १८.२८ टक्के आणि दोन्ही ग्रुप मिळून १८.४२ टक्के निकाल लागला आहे. सीए अंतिम परीक्षेत नवी दिल्लीतील शिवम मिश्रा देशात प्रथम, दिल्लीतील वर्षा अरोरा द्वितीय, तर मुंबईतील किरण मनराल आणि नवी मुंबईतील घिलमान अन्सारी यांनी तृतीय स्थान पटकावले.

‘सीए’ अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपमधून ७४ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २० हजार ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून ५८ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २१ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुप मिळून ३५ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ७ हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीए अंतिम परीक्षेत नवी दिल्लीतील शिवम मिश्रा याने ८३.३३ टक्के मिळवत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यानंतर दिल्लीतील वर्षा अरोरा ८०.०० टक्के मिळवत द्वितीय स्थानी, तर मुंबईतील किरण मनराल आणि नवी मुंबईतील घिलमान अन्सारी यांनी ७९.५० टक्के मिळवत तिसऱ्या स्थान मिळवले. दरम्यान, ‘सीए’ इंटरमिजिएट परीक्षेतील पहिल्या ग्रुपमधून १ लाख १७ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ३१ हजार ९७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून ७१ हजार १४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १३ हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुप मिळून ५९ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ११ हजार ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ‘सीए’ इंटरमिजिएट परीक्षेत भिवडी येथील कुशाग्र रॉय याने ८९.६७ टक्के मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तर अकोल्यातील युग करिया आणि भाईंदर येथील यग्य चांडक याने ८७.६७ टक्के मिळवत द्वितीय स्थान आणि नवी दिल्लीतील मनित भाटिया व मुंबईतील हिरेश काशिरामका यांनी ८६.५० टक्के मिळवत तिसरे स्थान पटकावले.

हेही वाचा – Hit and Run Case : आरोपी मिहीर शाह पोलिसांना म्हणाला, “माझं करीअर आणि…”

‘सीए’ अंतिम परीक्षेदरम्यान आर्टिकलशिप आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा समतोल राखावा लागतो. आर्टिकलशिप संपल्यानंतर मी उजळणीवर भर दिला. एका विषयाला नेमका किती वेळ द्यायचा, याची योग्य आखणी केली. संपूर्ण देशातून चांगला क्रमांक प्राप्त करणे, हे स्वप्न होते. परंतु ‘सीए’ अंतिम परीक्षेत संपूर्ण देशातून तिसरा क्रमांक प्राप्त केला हे कळल्यानंतर आनंदाश्रू आले. माझ्या कुटुंबासाठी हा भावूक क्षण होता. मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मी हे यश प्राप्त केले. – किरण मनराल, ७९.५० टक्के, मुंबई, संपूर्ण देशातून तिसरा क्रमांक

हेही वाचा – मुंबई : विनातिकीट प्रवाशांवर बडगा, ५२ कोटी रुपये दंड वसूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण देशातून तिसरा क्रमांक प्राप्त करेन, हे अपेक्षित नव्हते. मात्र, हे यश प्राप्त केल्यानंतर खूप आनंद झाला. आर्टिकलशिप सुरू असताना मी अभ्यासासाठीही वेळ द्यायचो आणि उजळणीही सुरू असायची. सकाळी लवकर उठायचो आणि दिवसभराचे नियोजन करायचो. दररोज दोन विषयांचा अभ्यास करायचो. जसजसे वेगवेगळे टप्पे पार केले, त्यानंतर आत्मविश्वास वाढत गेला. – गीलमान अन्सारी, ७९.५० टक्के, नवी मुंबई, संपूर्ण देशातून तिसरा क्रमांक