मुंबई : बांधकाम प्रकल्पासाठी कर्ज घेऊन ४८० कोटी रुपये बुडवल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी बांधकाम कंपनीच्या संचालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वित्तीय सेवा पुरवणाऱया कंपनीच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तक्रारदार रुची शहा या एडलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीत सहाय्यक उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार अंधेरी पश्चिम येथे एका प्रकल्पासाठी आरोपी बांधकाम व्यावसायिक कंपनी व त्यांच्या संचालकांनी ६०० कोटींचे डिबेंचर कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा करारात उल्लेख करण्यात आला नाही. त्यातील १४१ कोटी रुपये इतर खात्यात वळते करण्यात आल्याचा आरोप तक्रारी करण्यात आला आहे. यावेळी सनदी लेखापरिक्षण (सीए) करणाऱया कंपनीनेही या कर्जाचा करानुसार वापर झाल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यामुळे तक्रारदार रुची शहा यांच्या कंपनी मे. एडलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. यांना देणे असलेल्या डिबेंचर कर्जाची मुद्दल, ४८० कोटी रुपये परत फेड केले नाहीत. त्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप तक्रार करण्यात आला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत जुहू पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.