Dasara Melava 2022 latest news: मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडला. या मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्र सोडलं आहे. आम्हाला रेडे, डुक्कर म्हणणारे आता कुठे आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे गटावर अनेक गंभीर आरोप केले होते. शिंदे गट गुवाहाटीला गेला असताना राऊतांनी विविध उपमा देऊन बंडखोर आमदारांवर टीका केली होती. या सर्व टीकेचा समाचार एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून घेतला आहे.
संजय राऊतांना उद्देशून एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, “तुम्ही आम्हाला काय-काय म्हणाले होता, ४० रेडे, गटारातील घाण, डुक्कर, टपरीवाला, रिक्षावाला, पानवाला आणि आणखी बरंच काही तुम्ही म्हटलं होतं. आम्हाला रेडे, डुक्कर म्हणणारे आता कोठे आहेत? आमच्यावर बोलल्यावर काय होतं माहीत आहे ना? असा खोचक टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.
हेही वाचा- “…म्हणजे एकनाथ शिंदे मेले तरी चालतील” जुना प्रसंग सांगत रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरेंवरही शाब्दिक हल्ला केला आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं आहे, ते शिवसैनिक कधीही विसरणार नाहीत. म्हणून महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केलंय त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.