मुंबईत कंडोम वापरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. जन्म नियंत्रणाकडे लक्ष दिल्यास भारतात विवाहित जोडप्यांद्वारे वापरण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरात आणि महिलांच्या नसबंदीच्या प्रमाणात काहीशा प्रमाणात घट झाल्याची माहिती नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून समोर आली आहे. कुटुंब नियोजनात पुरूषांची भूमिका मोठी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. “देशातील २२ राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे बदल दिसून आले असल्याची माहिती,” भारतीय लोकसंख्या परिषदेचे डॉ. राजीब आचार्य यांनी सांगितलं.

गेल्या पाच वर्षांमध्ये कुटुंब नियोजनासाठी पुरूषांनीदेखील पुढाकार घेतला आहे. असं असलं तरी अनेकदा ती महिलेचीच जबाबदारी असल्याचं म्हणत स्त्रियांची नसबंदी ही सामान्य पद्धत असल्याचं मानलं जातं. “महिलांची नसबंदी ही सामान्य पद्धत असली तरी सध्याच्या परिस्थितीत कंडोमचा वार करणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुरूषांनी यात अधिक पुढाकार घेतल्याचं दिसत आहे,” अशी माहिकी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या डॉ. मिनिषा भिसे यांनी दिली. मुंबईत कंडोमचा वापर दुप्पट झाला असला तरी १० पैकी २ पुरूषचा त्याला प्राधान्य देत आहेत.

केवळ मुंबई शहराचा विचार केल्यास १० पैकी ७ विवाहित जोडपी पहिल्यापासूनच कुटुंब नियोजनाच्या पद्धतीशी जोडले गेल्याचं दिसून आलं. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणानुसार २०१५-१६ मध्ये त्यांची संख्या ५९.६ टक्के होती. परंतु २०१९-२० मध्ये ती वाढून ७४.३ टक्के झाली. याच कालावधीत कंडोमचा वापर ११.७ टक्क्यांवरून वाढून १८.१ टक्के झाला. तर दुसरीकडे महिला नसबंदीचं प्रमाण ४७ टक्क्यांवरून ३६.१ टक्क्यांवर आल्याचं सर्वेक्षणादरम्यान दिसून आलं. तसंच या कालावधीत गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाणही ३.१ टक्क्यांवरून कमी होऊन १.९ टक्क्यांवर आलं आहे. “गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शहरातील महिलांना आपलं वजन वाढण्याची चिता सतावत असते,” अशी माहिती स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. किरण यांनी दिली.

मुंबई उपनगरांमध्ये पुरुषांमध्ये कंडोमचा वापर हा दुप्पट झाल्याचं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणातून दिसून आलं. हा वापर ८.९ टक्क्यांवरू वाढून १८ टक्क्यांवर गेला. याचाच अर्थ १० पैकी २ पुरूष कंडोमचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकजे महिला नसबंदीत ४३ टक्क्यांवर ३७.५ टक्क्यांपर्यंत तर गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये ५.३ टक्क्यांवरून ०.९ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचंही सर्वेक्षणातून समोर आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून गोळा करण्यात आलेल्या माहितीतून महाराष्ट्राच्या एकंदरीत आकडेवारीत फारसा बदल दिसून आला नाही. परंतु कंडोमचा वापर ७.१२ टक्क्यांवरून वाढून १० टक्क्यांवर आणि महिला नसबंदीचं प्रमाण ५०.७ टक्क्यांवरून ४९.१ टक्क्यांवर आणि गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाण २.४ टक्क्यांवरुन १.८ टक्क्यांपर्यंत घसरल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं.