मुंबई : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बांधकाम व्यावसायिक जगदीश आहुजा (७२) याला नुकतीच अटक केली. गुंतवणुकदाराच्या तक्रारीवरून डिसेंबर २०२२ मध्ये सांताक्रुझ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार अनिल गेहाणी यांनी २०१० ते २०१६ या कालावधीत आरोपीच्या सांगण्यावरून पैशांची गुंतवणूक केली. सुरूवातीला तक्रारदार गेहाणी यांना परतावा मिळाला. पण त्यानंतर त्यांना रक्कम मिळणे बंद झाले. याप्रकरणी गेहाणी यांनी आहुजा यांच्याशी संपर्क साधला असता रोख रकमेऐवजी वरळीतील अल्ट्स प्रकल्पात सदनिका देण्याचा आश्वासन देण्यात आले होते. त्याबाबत करारही करण्यात आला होता. पण तक्रारदारांना रक्कम व सदनिका काहीच मिळाली नाही. गेहाणी यांनी १२ कोटी ३१ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सांताक्रुझ पोलिसांकडे केली होती. त्यानुसार सांताक्रुझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला स्थान मिळणार का? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तपासासाठी तो गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला. याप्रकरणी तपासात आहुजा यांनी दुबईतील भेटीत गेहाणी यांना २४ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवले होते, असा आरोप आहे. याप्रकरणी आणखी एका व्यक्तीचा सहभाग असून त्यालाही आरोपी करण्यात आले. याप्रकरणी नुकतीच आहुजा यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.