मुंबई : करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट कंपनीचे भागिदार सुजीत पाटकर याच्यासह एका डॉक्टरला अटक केली. गुन्ह्यातील रक्कम व्यवहारात आणण्यात आल्याप्रकरणी त्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. अटक करण्यात आलेला डॉक्टर हा करोना केंद्राचा प्रभारी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुजीत पाटकर व किशोर बिसुरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाटकर हा मध्यस्थ म्हणून काम करीत होता. तसेच आरोपी बुसुरेने डॉक्टरांची बनावट यादी बनवल्याचा आरोप आहे.

करोनाकाळात महापालिकेने केलेल्या चार हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या तपासणीला ईडीने सुरूवात केली आहे. ३८ कोटी रुपयांच्या लाईफलाईन जम्बो करोना केंद्राच्या कथित गैरव्यवहारापासून सुरू झालेल्या तपासाची व्याप्ती ईडीने वाढवली आहे. करोनाकाळात कामावर दाखवण्यात आलेले अनेक डॉक्टर तेथे प्रत्यक्षात उपस्थित नव्हते. त्यासाठी बनावट यादी बनवण्यात आली होती. त्या माध्यमातून मिळालेली रक्कम गैरमार्गाने व्यवहार आणण्यात आली, असा आरोप आहे.

हेही वाचा >>>पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत, शंभर लोकल फेऱ्या रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी चौकशी करीत आहे. किरीट सोमय्यांच्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणे, फौजदार विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनुसार, याप्रकरणी ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी लाईफलाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर,संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ऑक्टोबर,२०२२ मध्ये हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. यावर्षी जानेवारी महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावून लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसला देण्यात आलेले कंत्राट व खर्चाची मंजूर याबाबतची माहिती मागवली होती.