मुंबई : मध्य रेल्वेवरून धावणारी दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांतील प्रवाशांना कोकणातील प्रवास गैरसोयीचा होत आहे. त्यामुळे दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. ही मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद केल्याने मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगर, पालघर या भागातून दादर – रत्नागिरी रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु, ही रेल्वेगाडी दादर-रत्नागिरीऐवजी दिवा-रत्नागिरी करण्यात आली.
सध्या दिवा स्थानकात रेल्वेगाडीमध्ये पाणी भरण्याची सुविधा नाही. त्यामुळे ही रेल्वेगाडी पनवेल येथे पाणी भरण्यासाठी नेली जाते. त्यामुळे दिवा-रत्नागिरी रेल्वेगाडी ३० ते ४५ मिनिटे उभी करावी लागते. तसेच, मध्य रेल्वेवरील ९ थांबे रद्द करूनही या गाडीच्या प्रवास वेळेत विशेष घट झालेली नाही. एका थांब्यासाठी ८ ते १० मिनिटे गृहित धरून किमान एक तासाची घट अपेक्षित होती. मात्र, फक्त १० ते २० मिनिटांची घट झाली. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरचा विस्तार दादरपर्यंत करणे अपेक्षित आहे, असे म्हणणे प्रवाशांनी मांडले.
मागील चार वर्षांहून अधिक काळ मध्य रेल्वेकडे कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, आमच्या मागण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तसेच आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. मध्य रेल्वेने आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन त्या मान्य कराव्या, जर मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी नाईलाजास्तव मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा जल फाऊंडेशन कोकण विभागाने दिला आहे.
रेल्वेगाडीला नमो भारत रॅपिड रेल रेक जोडा
कोकणवासियांचा दररोजचा मुंबई-कोकण प्रवास दयनीय झाला आहे. प्रवाशांना वेळेत रेल्वेगाडी मिळत नाही. रेल्वेगाडीची दुरवस्था झाल्याने दैनंदिन प्रवाशांचा प्रवास आरामदायी होत नाही. त्यामुळे मुंबई – चिपळूणदरम्यान नवीन दैनंदिन रेल्वेगाडी सुरू करावी. ही रेल्वेगाडी नमो भारत रॅपिड रेल (वंदे मेट्रो) रेकने चालवावी. जेणेकरून प्रवाशांना सुविधा मिळतील आणि प्रवास आरामदायी होईल.
मुंबई – चिपळूण दैनंदिन रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापुर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबा द्यावा. तसेच ही रेल्वेगाडी पहाटे किंवा सकाळी लवकर मुंबईतून चालविण्याचे आणि चिपळूणवरून दुपारी किंवा सांयकाळी मुंबईकडे रवाना करण्याचे वेळापत्रक आखावे. या रेल्वेगाडीला द्वितीय श्रेणी आरक्षित, वातानुकूलित चेअरकार व सामान्य अनारक्षित डबे असावेत, अशी मागणी जल फाऊंडेशन कोकण विभागातर्फे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे (डीआरएम) करण्यात आली आहे.