मुंबई / Mumbai Dahi Handi 2025 Celebration : मुंबईत कृष्णजन्माचे निमित्त साधून शुक्रवारी मध्यरात्री ठिकठिकाणी गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडून उत्सवाचा मुहूर्त साधला. त्यानंतर गोपाळकाल्यानिमित्त शनिवारी गोविंदा पथकांमध्ये मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी अहमहमिका लागली होती. कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची तमा न बाळगता गोविंदा पथके मुंबई-ठाण्यात दहीहंडी फोडत फिरत होती. न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेले नियम पायदळी तुडवत गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी थर रचत होती.
थरांमध्ये सर्रास १४ वर्षांखालील मुलांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचे चित्रीकरण केले असून चित्रीकरणाच्या तपासणीत लहान मुलांचा थरात वापर केल्याचे आढळल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधाक गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई-ठाण्यात उंच दहीहंडीसाठी मोठ्या रकमांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. मोठ्या रकमेचे पारितोषिक मिळविण्यासाठी आणि अधिकाधिक थरांची नोंद आपल्या नावावर व्हावी यासाठी समस्त गोविंदा पथकांमध्ये चुरस लागली होती. मुंबई – ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये मोठ्या संख्येने गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. बहुसंख्य गोविंदा पथकांच्या थरांमध्ये १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग प्रकर्षाने दिसत होता. न्यायालयाने २०१७ मध्ये राज्य सरकारला दहीहंडी उत्सवाबाबत नियमावली तयार केली होती. त्यावेळी राज्य सरकारने १४ वर्षांखालील मुला-मुलींचा थरामध्ये सहभाग नसेल अशी हमी दिली होती. थरामध्ये लहान मुलांचा सहभाग आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. असे असतानाही शनिवारी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र अशा गोविंदा पथकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.
चित्रिकरण तपासून गुन्हे दाखल करणार
उत्सवापूर्वीच दहिहंडी पथकांबरोबर बैठक घेऊन लहान मुलांना सहभागी करून नये अशा सूचना दिल्या होत्या, असे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले. थरामध्ये लहान मुलांचा सहभाग आढळल्या, नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केला जातील असेही पथकांना बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उत्सवाच्या दिवशी कारवाई करणे कठीण असते. मात्र उत्सवानंतर चित्रिकरण तपासून थरामध्ये लहान मुले दिसली तर गुन्हे दाखल करू, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांची बघ्याचीच भूमिका
दहिहंडी उत्सवात नियमांचे उल्लंघन होत असल्याने लोकजागृती सामाजिक संघटनेने २०१४ मध्ये उच्च न्यायालयात सरकार आणि पोलिसांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानुसार २०१७ मध्ये १४ वर्षांखालील मुलांचा दहीहडीतील सहभागावर बंदी घालण्यात आली होती. परंतु लहान मुलांच्या सहभागाबद्दल पोलिसांची बघ्याची भूमिका असते असा आरोप संघटनेच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी केला. आम्ही पोलिसांना चित्रफिती दिल्या होत्या. त्यानंतर काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. परंतु हे प्रमाण नगण्य आहे. आता आम्ही पोलीस आणि शासनाने न्यायालायाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल नव्याने याचिका दाखल करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.
दहिहंडी उत्सवात उंच थर रचले जातात, तसेच लहान मुलांना सहभागी करून घेतले जाते. यामुळे दुर्घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी दहिसरच्या केतकीपाडा येथील नवतरूण मित्र मंडळ पथकातील ११ वर्षांच्या महेश जाधव या मुलाचा थर रचण्याचा सराव सुरू असताना पडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.