पाचव्या थरावरून कोसळून रायगडमध्ये एकाचा मृत्यू 

आयोजकांचा निरुत्साह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन यामुळे यंदा गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सव शनिवारी दुपारीच आटोपता घ्यावा लागला.

दरम्यान, दहीहंडी फोडताना रायगड जिल्ह्य़ाच्या म्हसळा तालुक्यातील खरसई गावात पाचव्या थरावरून कोसळून अर्जुन खोत (२५) याचा मृत्यू झाला. दिवसभर धुमाकूळ घालण्याच्या बेताने निघालेली गोविंदा पथके हताश अवस्थेत आणि रिकाम्या हाती माघारी परतली. रस्त्यावर अपेक्षेपेक्षा कमी गर्दी असल्याने आणि गोंगाटापासून काहीशी सुटका झाल्यामुळे सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होते.

दरवर्षी गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळीच गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी निघतात. मुंबई, ठाण्यातील मोठय़ा हंडय़ांची नेमकी माहिती पथकांकडे असते. त्यामुळे कोणती हंडी कधी फोडायची आणि किती वाजता परतीचा प्रवास सुरू करायचा याचे नियोजन असते. यंदा मोठमोठय़ा आयोजकांनी माघार घेतल्याने गोविंदा पथकांचे वेळापत्रक आणि आर्थिक गणितही बिघडले. बऱ्याच ठिकाणी हंडीच बांधली नसल्याने पथकांची वर्दळ, गोंगाट आणि बघ्यांची गर्दी यापासून अरुंद गल्ल्यांची सुटका झाली. मात्र हंडीच्या शोधात वणवण भटकणाऱ्या गोविंदांच्या दुचाकी, ट्रक, बस यामुळे मोठय़ा रस्त्यांवर काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.

मानाच्या हंडय़ांना मुकावे लागल्याने निराश झालेले गोविंदा लहानसहान आयोजकांच्या हंडय़ांकडे आशेने पाहात होते. इतक्यात अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी आली आणि दहीहंडी उत्सवातील उरलासुरला उत्साह मावळला. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर अनेक गोविंदा पथके पदपथांवरच विसावलेली आढळत होती.

दादर येथील ‘आयडियल’ची हंडी दरवर्षीप्रमाणे कलाकारांच्या उपस्थितीत आटोपशीरपणे पार पडली. येथे दृष्टिहीन मुलांच्या पथकाला हंडी फोडताना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. डोंबिवलीतील चार रस्ता येथे मनसे कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक मतदान यंत्राची (ईव्हीएम) हंडी बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ‘ईव्हीएम’ची प्रतिकृती जप्त केली. ठाणे येथे प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’मध्ये जय जवान गोविंदा पथकाने नऊ थर रचत आपला विक्रम कायम राखला.

गोपाळकाल्याच्या दिवशी गोविंदा पथकांना सर्वाधिक उत्सुकता असते ती ठाण्याच्या प्रो-कबड्डी स्पर्धेची. येथे नामांकित १४ पथकांमध्ये थरांची चुरस पाहायला मिळते. मात्र अरुण जेटली यांच्या निधनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. बऱ्याच आयोजकांनी यंदाचा उत्सव लवकर आवरता घेतल्याने ध्वनिक्षेपकांचा गोंगाटही कमी झाला.

‘दिवसभरात आम्ही तीन मोठय़ा हंडय़ा फोडल्या. पण प्रो-कबड्डी स्पर्धा रद्द झाल्यामुळे आमच्या नियोजन समितीला नवे वेळापत्रक तयार करावे लागले. आमच्या पथकाला फार त्रास झाला नाही, पण छोटय़ा पथकांना आर्थिक फटका बसला,’ असे जय जवान गोविंदा पथकाच्या आकाश कासार याने सांगितले.

कोल्हापूर-सांगलीतील महापूर आणि अरुण जेटली यांच्या निधनामुळे दहीहंडी उत्सवात फारसा उत्साह नव्हता. २००९मध्ये स्वाइन फ्लू आणि २०१४मध्ये न्यायालयाचे र्निबध याचा परिणाम दहीहंडी उत्सवावर झाला होता. आता गोविंदा अडचणींवर मात करायला शिकला आहे.    – उपेंद्र लिंबाचिया, दहीहंडी उत्सव समन्वय समिती

महिला गोविंदा पथक जालन्याला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील पहिले महिला गोविंदा पथक असलेल्या प्रबोधन कुर्ला संस्थेच्या गोरखनाथ पथकाने यंदा जालन्याला जाऊन दहीहंडी उत्सव साजरा केला. २०० महिलांच्या या पथकाने २४ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. हे पथक पाच थर लावण्याचा नियम काटेकोरपणे पाळते. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता केवळ सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने हे पथक उत्सव साजरा करते.