मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी आणि सोमावारी चांगला पाऊस पडला असला तरी मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या धरणक्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ८.६० टक्के पाणीसाठा आहे. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे मध्य वैतरणा धरणातील पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस वाट पाहून राखीव साठ्याचा वापर करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

यंदा मोसमी पावसाला लवकर सुरुवात झाली असली आणि मुंबईसह राज्यात पावसाने जोर धरलेला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या एकूण ८.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडून मुंबईचे रस्ते जलमय झाले, त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असला तरी धरणातील पाणीसाठा मात्र खालावत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या सातही धरणांत एकूण १ लाख २४ हजार ४७१ दशलक्ष लीटर म्हणजेच ८.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली असून मागणी मान्य झाली आहे. मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारला पत्र लिहून उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लीटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लीटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. धरण क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने उर्ध्व वैतरणा धरणातील पाणीसाठा वापरण्यास सुरुवात केल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिसेकंद ३५० क्युबिक फूट पाणी वापरण्यात येत आहे. मात्र सोमवारपासून चांगला पाऊस झाल्यामुळे येत्या दोन दिवसा पुन्हा एकदा पाणीसाठ्याचा आढावा घेऊन राखीव साठ्याच्या वापराबाबत पुन्हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवार पडलेल्या पावसामुळे मध्य वैतरणा धरणाची पाणी पातळी अवघ्या ३० सेमीने वाढल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्यावर्षीही उन्हाळ्यात राखीव साठ्याचा वापर करण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली होती. जून २०२४ मध्ये पाणीसाठा ५ टक्क्यांपर्यंत खालावला होता. तेव्हा राखीव साठ्याचा वापर सुरू करण्यात आला होता. तशीच स्थिती यंदाही आहे. मात्र येत्या काही दिवसांत पावसाने जोर धरला तर राखीव साठा वापरावा लागणार नाही. धरणक्षेत्रात रविवारी अगदीच तुरळक पाऊस पडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा – ०.९१ टक्के
मोडक सागर – २६.०५ टक्के
तानसा – ९.३९ टक्के
मध्य वैतरणा – १०.६७ टक्के
भातसा – ६.०० टक्के
विहार – ३३.३०टक्के
तुळशी – २८.६२ टक्के
एकूण – ८.६० टक्के