महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसेच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली.

प्रशासनाने जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून योग्य ती पावलं उचलावीत-एकनाथ शिंदे

पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असे निर्देश त्यांनी दिले. संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी,तसेच आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे. पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा यावर विशेष लक्ष ठेवावे. मोडकळीस झालेल्या आणि धोकादायक इमारतीत संदर्भात देखील काळजी घ्यावी, मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू कशी राहील, किंवा जिथे मोठी अडचण येईल तिथे प्रवाशांना त्रास कसा होणार नाही यासाठी सतर्क रहावे असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले

आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका-एकनाथ शिंदे

हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर वाढू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समुद्राला मोठी भरती, सुमारे चार मीटरपर्यंत लाटा उसळणार

मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय झाली.दरम्यान, आज सकाळी ११.२४ वाजता समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.७५ मीटरच्या उंच लाटा उसळणार आहेत. भरतीच्या कालावधीत जोरदार पाऊस झाल्यास मुंबईची वाहतूक सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत शिवडी कोळीवाडा येथे १२ मिमी, गोखले रोड महानगरपालिका शाळा-११ मिमी, चेंबूर कलेक्टर कॉलनी-१३ मिमी, चेंबूर अग्निशमन केंद्र ९ मिमी, नारियलवाडी सांताक्रूझ – २५ मिमी, खार दांडा- २४ मिमी, विलेपार्ले अग्निशमन केंद्र -१५ मिमी, मालवणी अग्निशमन केंद्र – १२ मिमी आणि वर्सोवा उदंचन केंद्र येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली.